छोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:51 AM2018-04-25T01:51:05+5:302018-04-25T01:51:05+5:30

बलात्कार प्रकरण : ११ जूनपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Interim relief to Rajan's brother | छोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा

छोटा राजनच्या भावाला अंतरिम दिलासा

Next

मुंबई : बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याला मंगळवारी अंतरिम दिलासा दिला. त्याला ११ जूनपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने निकाळजे याला अटक करण्यापासून अंतरिम दिलासा दिला असला तरी नवी मुंबईत न जाण्याची अट घातली आहे. कामानिमित्त नवी मुंबईत जावे लागले, तर तपास अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने निकाळजे याला दिले. मार्च महिन्यात दीपक निकाळजेविरुद्ध तक्रार करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (ए) (लैंगिक शोषण), ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे), ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
जामीन मिळवण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत हवी होती. त्यानिमित्त ती दीपक निकाळजेच्या संपर्कात आली. १८ वर्षांची असताना ती आणि तिची आई निकाळजेला भेटल्या. आर्थिक मदत केल्यानंतर निकाळजे लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण करू लागला. काही कालावधीनंतर पीडितेला युटरीन कॅन्सर झाल्याचे व ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. या काळात निकाळजे तिला खूप मारझोड करी. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला.
त्यावर निकाळजेचे वकील शिरीष गुप्ता यांनी मुलीच्या संमतीनेच निकाळजेने शारीरिक संबंध ठेवल्याचे न्यायालयाला सांगितले. पीडिता त्याच्याबरोबर काश्मीर व अन्य ठिकाणी फिरली. पीडिताच त्यांच्या संबंधाविषयी कुुटुंबीयांना माहिती देण्याची धमकी निकाळजेला देत असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला.

अहवाल सादर करावा लागणार
दीपक निकाळजे याला ११ जूनपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. तोपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश नवी मुंबई पोलिसांना न्यायालयाने दिले.

Web Title: Interim relief to Rajan's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.