'आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 08:15 AM2019-06-27T08:15:20+5:302019-06-27T08:16:37+5:30

मोदी यांच्या विजयाचा पाया 44 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने घातला. राज्यकर्त्याने सत्ता-गैरवापराचे कोणते टोक गाठू नये हा तो धडा होता.

'Indira Gandhi gave an opportunity to unite opponents by imposing emergency' Says Shiv Sena | 'आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली'

'आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली'

Next

मुंबई - इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष विलीन झाले व त्यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव केला. काँग्रेसने आत्मा चिरडला, पण देशाचा आत्मा मेला नाही. लोकांनी काँग्रेसला धडा शिकवला. देशात इंदिरा गांधींचा, गांधी परिवाराचा, काँग्रेसचा पराभव होऊ शकतो हा विश्वास लोकांत निर्माण करण्याचे काम आणीबाणीने केले ही सकारात्मक बाजू लक्षात घेतली पाहिजे असं सामना संपादकीयमधून सांगण्यात आलं आहे. 

तसेच मोदी हे हुकूमशहा आहेत किंवा अप्रत्यक्ष आणीबाणी लादत आहेत हे भय असते तर विरोधकांचे ऐक्य मजबूत व्हायला हवे होते. उलट जे झाले ते फुटले. याचे खापरही काँग्रेसवाले मोदींच्याच माथी मारणार काय? काँग्रेस व इतर चिरकूट विरोधकांनी आत्मचिंतनासाठी केदारनाथच्या गुहेतच जावे. मंथन करावे, चिंतन करावे असा टोलाही शिवसेनेने हाणला. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी मोदी व भाजप आजही काँग्रेस तसेच गांधी परिवारास राजकीय शत्रू मानतात. काँग्रेस पक्षाचे मुंडके ठेचले आहे आणि वळवळणाऱ्या शेपटांवर काठी मारली जात आहे. 
  • ‘देशाचा आत्मा चिरडणारी आणीबाणी कोणी लादली? देशाची संसदीय परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी केला? अशा प्रश्नांचे प्रहार मोदी यांनी केले. 
  • 25 जूनच्या रात्री इंदिरा गांधी यांनी देशाला आणीबाणीची काळीकुट्ट भेट दिली. त्यास 44 वर्षे झाली. मोदी यांनी ते निमित्त केले व राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा नूरच पालटून टाकला. मोदी बोलत होते तेव्हा काँग्रेसवाल्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. 
  • आणीबाणीनंतर जन्मास आलेली नवी पिढी सध्या राजकारणात आहे. चाळीस वर्षांहून कमी वय असलेले तरुण आज संसदेत आहेत. मुख्यमंत्री व मंत्री बनले आहेत. आणीबाणीने देशाला काय दिले यातून आता बाहेर पडायला हवे. 
  • मोदी यांच्या विजयाचा पाया 44 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने घातला. राज्यकर्त्याने सत्ता-गैरवापराचे कोणते टोक गाठू नये हा तो धडा होता. दमन चक्राविरोधात निर्भीडपणे बोलणारी व लढणारी एक पिढी त्यातून निर्माण झाली. त्या पिढीने काँग्रेससमोर आव्हान उभे केले. 
  • आणीबाणीनंतर रायबरेली, अमेठीत गांधी परिवाराचा पराभव झाला व आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीत पराभव झाला. देशाला शिस्त लावण्यासाठी व अराजकापासून वाचविण्यासाठी आणीबाणी आणावी लागली हे तेव्हाचे समर्थन होते, पण अशा प्रकारची कोणतीही प्रत्यक्ष आणीबाणी न लादताही देशावर शिस्तीचा हंटर कडाडता येतो हे मोदी यांनी दाखवून दिले. 
  • विरोधकांना तुरुंगात फेकण्यापेक्षा लोकशाही मार्गाने त्यांचा पराभव करणे हा योग्य मार्ग आहे. काँग्रेसचे नेते व त्यांचे बगलबच्चे सरकारवर जे आरोप करीत होते ते जनतेने नाकारले. 
  • देशाचा आत्मा फक्त जिवंत ठेवण्यासाठी नव्हे, तर ‘अमर’ ठेवण्यासाठी उचललेली ही पावले आहेत. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष राहिलेला नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पिंपळाच्या झाडावर उलटय़ा लटकलेल्या हडळीसारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. 
  • विरोधकांचा आत्माच हरवल्याने ‘आत्म’चिंतन करावे असे आम्ही म्हणणार नाही. मोदी यांनी लोकसभेत हल्ला केला. त्यात विरोधकांची वळवळणारी शेपटीही चिरडली आहे.

Web Title: 'Indira Gandhi gave an opportunity to unite opponents by imposing emergency' Says Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.