चार महिन्यांत चार डीजी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:45 AM2018-05-22T01:45:34+5:302018-05-22T01:45:34+5:30

अतिवरिष्ठ पदावर मोठे फेरबदल शक्य : पांडे, कनकरत्नम, नागराळे, परमबीर सिंग यांना बढती

Four DGs will be retired in four months | चार महिन्यांत चार डीजी होणार निवृत्त

चार महिन्यांत चार डीजी होणार निवृत्त

Next

मुंबई : पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांबाबत गृहविभागाकडून विलंब होत असला, तरी पुढील चार महिन्यांत खात्यात वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. येत्या ३१ मे पासून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह तब्बल चार महासंचालक दर्जाचे अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. पहिली ‘रिटायरमेंट’ येत्या ३१ मे रोजी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे प्रमुख व्ही. डी. मिश्रा यांच्यापासून होत आहे.
अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांची प्रथमच एवढ्या सलग दिवसांत निवृत्ती होत आहे. त्यामुळे त्यांच्या पदावरील नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या विचारपूर्वक कराव्या लागणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात डीजी दर्जाची सध्या आठ पदे मंजूर आहेत. त्यापैकी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) वगळता, अन्य ठिकाणी अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी निवृत्तीची सुरुवात व्ही. डी. मिश्रा यांच्यापासून होईल. १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी मिश्रा दोन वर्षांपासून पोलीस गृहनिर्माण विभागात आहेत. त्यांच्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे, ३० जूनला पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त होत आहेत. ते १९८१च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर दोन महिन्यांत ३१ आॅगस्टला मुंबई पोलीस दलाचे प्रमुख दत्ता पडसलगीकर यांची निवृत्ती आहे. ते १९८२च्या बॅचचे अधिकारी असून सव्वा दोन वर्षांपासून आयुक्त आहेत. त्यानंतर, न्यायवैधक व तंत्रज्ञचे प्रमुख एस. पी. यादव ३० सप्टेंबरला निवृत्त होतील.
या चार अधिकाºयांबरोबरच जूनमध्ये विशेष महानिरीक्षक विजय जाधव, छगन वाकडे आणि पुणे रेल्वेचे अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत सेवानिवृत्त होत आहेत. बुधवंत यांचे नाव अप्पर आयुक्त पदाच्या बढतीच्या यादीत आहे. मात्र, गृहविभागाच्या दिरंगाईमुळे त्यांना कदाचित अवघ्या काही दिवसांसाठीच बढतीचा आनंद घेता येईल. जूनपूर्वी बढत्या जाहीर न झाल्यास, बढतीच्या प्रतीक्षेत त्यांना निवृत्त व्हावे लागेल.

परमबीर सिंग यांना लवकर बढती
चार महिन्यांत रिक्त होणाºया चार डीजींसाठी महावितरण कंपनीचे सुरक्षा संचालक सुरेंद्र पांडे, नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम, नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे व ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग हे सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र ठरतात. त्यांना टप्प्याटप्प्याने बढती दिली जाईल. पैकी पहिले तिघे १९८७च्या बॅचचे तर परमबीर सिंग हे १९८८च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्याआधी एटीएसचे माजी प्रमुख दिवंगत हिमांशू रॉय यांचा नंबर होता. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे सिंग यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आले आहे. डीजीचे प्रमोशन मिळत असल्याने, त्या जोरावर ते मुंबईचे आयुक्तही बनू शकतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

...तरच पडसलगीकरांना मुदतवाढ
सतीश माथूर ३० जूनला निवृत्त झाल्यानंतर, त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होईल. मात्र, त्यांना केवळ दोन महिन्यांचा अवधी मिळणार असल्याने, कदाचित तीन महिन्यांची मुदतवाढ राज्य सरकारकडून दिली जाईल. मात्र, त्यासाठी मुंबईच्या आयुक्तपदी सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवरील सुबोध जयस्वाल यांची निवड झाली, तरच हा निर्णय होईल. जयस्वाल यांना राज्यात परत येण्याबाबत कळविले असले, तरी त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पडसलगीकर यांच्यानंतर सध्या सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे व ठाण्याचे आयुक्त परमवीर सिंग यांची चर्चा आहे. पडसलगीकर यांना मुदतवाढ दिल्यास काही अधिकारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सरकारसाठी ते डोकेदुखी ठरू शकते.

Web Title: Four DGs will be retired in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस