याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:54 AM2023-05-08T11:54:16+5:302023-05-08T11:56:31+5:30

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कर्नाटक निवडणुकांच्या मतदानापूर्वी सीमाभागातील मतदारांना आवाहन केलंय.  

Elect this Marathi candidate only, Raj Thackeray's appeal to voters in border areas of karnatak | याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

googlenewsNext

मुंबई/बेळगाव- कर्नाटकातील निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेतेमंडळींनी कर्नाटकात जाऊन विधानसभा उमेदवारांसाठी प्रचार केला. भाजपकडून महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी तर शिवसेनेचे एकनाथ शिंदेही पोहोचले होते. तर, काँग्रेसच्या सोनिया गांधींपासून ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जोरदार प्रचार केला. शिवसेनेनं मराठी एकीकरण समितीच्या बाजुने उभे राहण्याचं आवाहन केलं आहे. आता, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कर्नाटक निवडणुकांच्या मतदानापूर्वी सीमाभागातील मतदारांना आवाहन केलंय.  

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी, असे म्हणत राज ठाकरेंनी मराठी माणूसच तेथील आमदार हवा, असे सूचवले आहे.  

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. 

कर्नाटक सरकारच्या वागण्यात फरक नसतो
  
मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत, असे राज ठाकरेंनी म्हटलं.  

दरम्यान, सीमाभागातील लोकांना १० मे रोजी ही संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका, अशा शब्दात राज ठाकरेंनी सीमाभागातील मतदारांना आवाहन करत मराठी उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.  

 

Web Title: Elect this Marathi candidate only, Raj Thackeray's appeal to voters in border areas of karnatak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.