श्वान, मांजरांसाठी स्मशानभूमी, मुंबई महापालिकेकडून ३ ठिकाणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:58 AM2018-01-24T02:58:59+5:302018-01-24T02:59:10+5:30

कुत्रे व मांजरांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली आहे.

 Dogs, Cemetery for Cats, 3 places to be selected from Mumbai Municipal Corporation | श्वान, मांजरांसाठी स्मशानभूमी, मुंबई महापालिकेकडून ३ ठिकाणांची निवड

श्वान, मांजरांसाठी स्मशानभूमी, मुंबई महापालिकेकडून ३ ठिकाणांची निवड

Next

मुंबई : कुत्रे व मांजरांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी, देवनार आणि मालाड परिसरात स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित असून, तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने सीएनजीवर आधारित असणार आहेत.
सद्य:स्थितीमध्ये परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार स्थळ असून ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते. महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची कार्यवाही बोरीवली परिसरातल्या कोरा केंद्र या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजरांसारख्या पाळीव प्राण्यांचे प्रमाणही मोठे आहे. या पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्यदृष्ट्या योग्य असतीलच असे नाही. या बाबी लक्षात घेऊन, तसेच कुत्रे वा मांजरांची संख्या लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात त्यांच्यासाठी ३ स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
स्मशानभूमीमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ व इतर आस्थापना खर्च सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत निवड होणाºया संस्थेद्वारे केला जाणे अपेक्षित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया जून २०१८ मध्ये होणे अंदाजित असून त्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांत तिन्ही स्मशानभूमी कार्यान्वित होतील.
स्मशानभूमींमध्ये कुत्रे, मांजरी यासारख्या पाळीव प्राण्यांचे मृतदेह आणि अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर येथे मृत होणाºया प्राण्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा
मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
...म्हणून दिली स्मशानभूमीला मंजुरी-
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांची मोठी संख्या आहे. अनेक घरांमध्ये हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. वयोमानापरत्वे किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने स्मशानभूमी उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
महालक्ष्मी, देवनार व मालाड येथे पर्यावरणपूरक स्मशानभूमी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तसेच स्मशानभूमीच्या परिरक्षणासाठी व इंधनासाठी होणारा खर्च महापालिकेद्वारे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- डॉ. योगेश शेट्ये, महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह
सध्या महापालिका क्षेत्रात तीनशेपेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने असून परळ परिसरात एक रुग्णालय आहे.
महापालिकेद्वारेसुद्धा पाळीव प्राण्यांसाठीचा स्वतंत्र दवाखाना खार परिसरात कार्यरत आहे
२०१२ च्या प्राणी गणनेनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ३३ हजार ५७२ कुत्रे आहेत.
२०१४ मध्ये महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार मनपा क्षेत्रात ९५ हजार १७२ भटके कुत्रे आहेत.

Web Title:  Dogs, Cemetery for Cats, 3 places to be selected from Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.