रंगभूमी टिकविण्यासाठी आर्थिक बाजूंचा विचार करीत नाही! - नयना आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:08 AM2018-04-02T07:08:38+5:302018-04-02T07:08:38+5:30

मराठी रंगभूमीवर अनेकविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी नयना आपटे यांचा नव्या-जुन्या नाटकांच्या निमित्ताने रंगभूमीवर सातत्याने वावर असतो. त्यामुळे त्यांनी आपला खास असा प्रेक्षकवर्ग जपला आहे. त्यांच्या नाटकांची नाळ तीन पिढ्यांशी जुळलेली आहे.

 Do not think the economic side to save the theater! - Nayana Apte | रंगभूमी टिकविण्यासाठी आर्थिक बाजूंचा विचार करीत नाही! - नयना आपटे

रंगभूमी टिकविण्यासाठी आर्थिक बाजूंचा विचार करीत नाही! - नयना आपटे

googlenewsNext

मराठी रंगभूमीवर अनेकविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी नयना आपटे यांचा नव्या-जुन्या नाटकांच्या निमित्ताने रंगभूमीवर सातत्याने वावर असतो. त्यामुळे त्यांनी आपला खास असा प्रेक्षकवर्ग जपला आहे. त्यांच्या नाटकांची नाळ तीन पिढ्यांशी जुळलेली आहे. नयना आपटे यांना ‘पद्मश्री’ हा बहुमान प्रदान करून, त्यांच्या नाट्य क्षेत्रातील कार्याचा यथोचित सन्मानही करण्यात आला. ‘फार्ससम्राट’ बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या नव्याने रंगभूमीवर आलेल्या नाटकात त्या राधाबार्इंची मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या निमित्ताने ‘लोकमत’ चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे, त्याविषयी काय सांगाल?
- बबन प्रभू यांचे हे नाटक १९७३ मध्ये जेव्हा रंगभूमीवर आले होते, तेव्हा ते मी पाहिले होते. बबन प्रभू यांच्या इतर नाटकांत काम केल्याने, त्यांच्या नाटकाची शैली मला माहीत आहे. त्यांच्या नाटकाची भाषा मी जाणते, पण त्यांच्या या नाटकात काम करायची संधी आजपर्यंत मिळाली नव्हती. ती आता मिळते आहे, याचे समाधान आहे. या नाटकात ‘राधाबाई’ हे पात्र साकारण्याचा आनंदच मुळी मोठा आहे.
बबन प्रभू यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य काय?
- बबन प्रभू यांचे हे नाटक आजच्या पिढीला माहीत आहे की नाही, याची कल्पना नाही, परंतु बबन प्रभू हे नाव मात्र सगळ्यांना माहीत आहे. रंगभूमीवर ‘फार्स’ हा प्रकार त्यांनीच रुजवला. दमदार लेखणी आणि वेगळ्या धाटणीचा विनोद, हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांनी लिहिलेली वाक्ये बोलताना वेगळे काहीच करावे लागत नाही. बबन प्रभू यांची लेखणी अजरामर व्हावी, असे आम्हाला वाटते. आजही हे नाटक करताना ते
तितकेच ताजे वाटते, यातच सर्वकाही आले. ही त्यांच्या लेखणीचीच कमाल आहे.
संतोष पवार दिग्दर्शक म्हणून कसा आहे?
- संतोष पवार यांनी हे नाटक नव्या पद्धतीने ‘मोल्ड’ केले आहे. नव्या प्रसंगांचा वापर त्यांनी यात केला आहे. २०१८ मध्ये हे नाटक आणताना संतोष पवार यांनी त्याला वेगळी झळाळी दिली आहे. याला सुधारित रंगावृत्ती म्हटले तरी चालेल. या नाटकाचा आत्मा तोच आहे, पण आजच्या प्रेक्षकांना रुचेल, पटेल, भावेल आणि समजेल, अशा पद्धतीने हे नाटक बांधले आहे. आमच्याकडून त्यांनी छान कामे करून घेतली आहेत. बबन प्रभू आणि संतोष पवार यांच्या ‘स्टाईल’चे उत्तम मिश्रण यात दिसून येईल. बबन प्रभू यांची पद्धत शाब्दिक विनोदावर जोर देण्याची होती, तर संतोष पवार यांनी घटनात्मक विनोद निर्माण करण्यावर भर दिला आहे.
सहकलाकारांचे सहकार्य कसे आहे?
- कलाकार हा सदैव विद्यार्थीच असतो. कलाकाराने सतत काही ना काही शिकत राहिले पाहिजे. माझे या नाटकातले सहकलाकार उत्तम आहेत. विनय येडेकर यांनी यापूर्वी माझ्यासोबत काम केले आहेच, पण यातले नवीन कलाकारही खूप मेहनत घेणारे आहेत आणि त्यांच्या मेहनतीचे नक्कीच चीज होईल. दोन महिने आम्ही या नाटकाची तालीम केली आहे. त्यामुळे आम्ही जे काही ठरवले आहे, ते पुढे नक्कीच साध्य होईल, याची आम्हाला खात्री आहे.
या नाटकाचे वैशिष्ट्य काय?
- काही नाटकांत ठरावीक पात्रांनाच ‘स्कोप’ असतो. मात्र, या नाटकाचे तसे नाही. या नाटकात प्रत्येक पात्राला ‘स्कोप’ आहे, महत्त्व आहे. आपल्यामध्ये काय ‘क्वालिटी’ आहे, हे यातल्या प्रत्येक पात्राला दाखविण्याची संधी या नाटकात आहे. १० वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या रसिकांपर्यंत हे नाटक पोहोचावे, असे आम्हाला मनापासून वाटते.
एकूणच आजच्या रंगभूमीविषयी काय वाटते?
- आज अनेक अडचणींतून रंगभूमी जात असली, तरी ‘थिएटर’ हे टिकलेच पाहिजे, असेच सर्वच रंगकर्मींना वाटते. अशा वेळी आम्ही आर्थिक बाजूचा विचार करत नाही. रंगभूमी पुढे जाण्यासाठी आणि रंगभूमीच्या संवर्धनासाठी जे-जे काही करता येईल, ते-ते करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करत राहणार.

Web Title:  Do not think the economic side to save the theater! - Nayana Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी