आराखड्याचा ‘विकास’ मुंबईकरांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:56 AM2018-07-28T00:56:51+5:302018-07-28T00:57:28+5:30

नकाशे संकेतस्थळावर; सूचना, हरकतींसाठी महिनाभराची मुदतवाढ

The development of the plan is in the hands of the Mumbaikars | आराखड्याचा ‘विकास’ मुंबईकरांच्या हातात

आराखड्याचा ‘विकास’ मुंबईकरांच्या हातात

Next

मुंबई : मंजूर विकास आराखडा-२०३४ आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली २०३४ या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे महानगरपालिकेस प्राप्त नकाशे जनतेच्या माहितीसाठी व अवलोकनार्थ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तिन्ही भागांच्या नकाशांचा समावेश आहे. आराखड्यातील बदलांच्या नकाशांबाबत सूचना व हरकती या राज्य शासनाच्या अखत्यारितील नगररचना खात्याच्या उपसंचालकांकडे नोंदवायच्या आहेत, त्यामुळे आता या आराखड्याचा विकास मुंबईकरांच्या हाती आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या शहर भागाशी संबंधित नकाशांवर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ५ आॅगस्ट ही अंतिम मुदत आहे. पश्चिम उपनगरांसाठी १६ आॅगस्ट अंतिम तारीख आहे. नुकत्याच अपलोड करण्यात आलेल्या पूर्व उपनगरांच्या नकाशांसाठी २५ आॅगस्ट अंतिम मुदत आहे. महापालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी याबाबत सांगितले की, मुंबई शहर व उपनगरांचा विकास आराखडा (२०३४), विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली (२०३४) यास ८ मे २०१८ रोजीच्या शासनाच्या अधिसूचनेद्वारे सारभूत स्वरूपाचे बदल वगळून मंजुरी देण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिसूचना १३ -२३ मे २०१८ च्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आराखड्यातील फेरबदलांच्या अनुषंगाने सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाने ८ मे २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेबाबत २२ जून २०१८ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार सदर आराखड्यातील मंजूर भाग १ सप्टेंबर २०१८ पासून अमलात येईल.
शासनाच्या नगर विकास विभागाने ८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेबाबत २९ जून २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे शुद्धीपत्रक व पूरकपत्रक जारी केले आहे. ही अधिसूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

५ आॅगस्ट अंतिम मुदत
शहर भागाचे नकाशे ५ जुलैपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, यासाठी सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ५ आॅगस्ट अंतिम मुदत आहे.
पश्चिम उपनगरांशी संबंधित नकाशे १६ जुलैपासून संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यासाठी सूचना व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख १६ आॅगस्ट आहे.
पूर्व उपनगरांसाठी संबंधित नकाशे २५ जुलैपासून संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यासाठी सूचना व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख २५ आॅगस्ट आहे.

येथे नकाशे उपलब्ध
महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक ३ मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या कालावधी दरम्यान बघण्यासाठी हे नकाशे उपलब्ध आहेत.
नकाशांच्या अनुषंगाने सूचना व हरकती या अंतिम तारखेपूर्वी मांडता येणार आहेत. उपसंचालक, नगररचना, बृहन्मुंबई, ई ब्लॉक, इएनएसए हटमेंट, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई - १ कार्यालयात सूचना व हरकती सादर करायच्या आहेत.
 

Web Title: The development of the plan is in the hands of the Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.