अलौकिक अनुभव देणारे संगीत देवबाभळी

By अतुल कुलकर्णी | Published: May 4, 2019 11:51 AM2019-05-04T11:51:56+5:302019-05-04T11:52:56+5:30

सुखी संसाराची गुरुकिल्ली सांगणारं नाटक

Devababhali music that gives superhuman experience | अलौकिक अनुभव देणारे संगीत देवबाभळी

अलौकिक अनुभव देणारे संगीत देवबाभळी

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी

संत तुकारामांची पत्नी आवली. तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तो काटा साक्षात पांडूरंग येऊन काढतो अशी एक आख्यायिका. पण त्या कथेला वेगळे वळण देत, लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी काटा काढल्यानंतर, गरोदर आवलीच्या देखभालीसाठी पांडूरंग; रखुमाईला आवलीच्या घरी पाठवत ‘संगीत देवबाभळी’ नाटकाची कथा गुंफली आहे. ज्यांना विठ्ठल, तुकाराम, रखुमाई, कृष्ण हे संदर्भ माहिती असतील त्यांना हे नाटक वेगळा अनुभव देते आणि ज्यांना हे माहिती नसेल त्यांच्यासाठी हे नाटक सामान्य आणि असामान्य अशा दोन महिलांच्या जगण्याची कथा मांडते.

सगळा संसार वाऱ्यावर सोडून आपला नवरा विठ्ठलाच्या नादी लागला, आपल्याकडे, आपल्या घराकडे लक्ष द्यायलाही त्याला वेळ नाही ही आवलीची खंत. त्यासाठी ती कायम विठ्ठलाला दोष देत रहाते. तर विठ्ठलावर रुसून रखुमाई दिंडीरवनात भटकते आहे. तरीही विठ्ठलाच्या सांगण्यावरुन ती गरोदर आवलीच्या सेवेसाठी तिच्या घरी लखूबाई बनून जाते. तेथे गेल्यावर सतत विठ्ठलाला बोल लावणारी, त्याला वाट्टेल ते बोलणारी आवली पाहून रखूमाईचा पारा चढतो. आपल्या नवऱ्याला बोलणारी ही कोण लागून गेली याचा तिला रागही येत असतो आणि आपल्या नवऱ्याच्या नादी लागून हीच्या संसाराची अशी अवस्था झाल्याने तिला वाईट ही वाटत रहाते. यातून त्या दोघीत जे काही संवाद घडतात, आणि दोघींची आपापल्या नवऱ्याविषयीची मतं ज्या पध्दतीने समोर येतात, त्यातून हे नाटक आकारला येते. या कथेच्या पलिकडे जात हे नाटक आजच्या पिढीचं, आजच्या समाजाचं दु:ख मांडणारं एक नाट्य प्रेक्षकांसमोर उभे करते.

रखुमाईच्या जागी आजच्या काळातली कोणत्याही क्षेत्रात मान सन्मान, नावलौकीक मिळवलेल्या व्यक्तीची महिला पत्नी आणा, आणि रोजच्या जगण्याचे विकट प्रश्न सोडवणारी, रिकाम्या संसाराची चिंता लागलेल्या आवलीच्या जागी सामान्य नोकरदार माणसाची बायको आणा, मग या नाटकाकडे पाहा -

आज कोणत्याही नावलौकिक मिळवलेल्या माणसाच्या बायकांची मुख्य तक्रार काय असते? माझ्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही, जगासाठी हे वेळ काढतात, यांच्या मित्रांसाठी यांना वेळ असतो पण माझ्यासाठी यांच्याकडे वेळ नाही... रखुमाई देखील हीच तक्रार करत असते. विठ्ठलाकडे फक्त त्याच्या भक्तांसाठीच वेळ आहे. तो फक्त आणि फक्त भक्तांचाच आहे, माझ्यासाठी त्याच्याकडे काहीच नाही...

कोणत्याही सामान्य नोकरदार माणसांची बायको तिच्या संसार सुखाचा व्हावा म्हणून कष्ट उपसत रहाते. पै पै गोळा करुन संसाराचा गाडा ओढत रहाते. तिचा नवरा, मी जे काही करतोय ते घरच्यासाठीच करतोय असे म्हणत दिवसरात्र काबाडकष्ट करत घरदार विसरुन गेलाय... इकडे तुकारामाची बायको आवली देखील अशीच तक्रार करत रहाते, कारण तिचाही नवरा विठ्ठलाच्या नामस्मरणात घरदार पार विसरुन गेलाय...

या नजरेतून हे नाटक आपण पाहू लागलो की ते प्रत्येकाला आपलं वाटू लागतं. त्यामुळेच आवली आणि रखुमाईत होणारे संवाद त्यांना आपले वाटू लागतात. भावतात. एका प्रसंगात रखुमाई आवलीला विचारते, तू शेवटचं कधी पावसात भिजली होतीस, आनंदानं पाऊस कधी अंगावर घेतला होतास... असाच काहीसा सवाल आजच्या सामान्य आणि नावलौकिक मिळवलेल्या नव-याच्या बायकांनाही पडलाय... आपल्या नवऱ्याने कधी आपल्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला होता... कधी आपल्याला त्याने स्वत:हून जेवायला बाहेर नेलं होतं... असे प्रश्न नाटक पहाणा-याला आपले वाटत रहातात...

आजच्या नवरा बायकोच्या नातेसंबंधात होणारे ताणतणाव आणि त्यातून एकमेकांवर रुसवा धरुन निघून जाणाऱ्या नवऱ्याला किंवा बायकोला हे नाटक जाता जाता एक आपुलकीचा संदेशही देतं. रुखुमाई देवी असली तरी तिच्या मनात अजूनही राग, लोभाच्या भावना आहेत. त्यामुळेच ‘‘कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचूनही परत माघारी का फिरायचं...?’’ असा सवाल रखुमाई करते तेव्हा ‘‘असं रुसून सगळं सोडून थोडचं जायचं असतं बाई... घरावर रुसून निघून गेले आणि परत यायची इच्छा झाली तेव्हा घरच जागेवर नसलं तर...? माणूस विसरुन जाईल इतका अबोला बरा नाही आई...’’ असा सल्ला रखुमाईला आई म्हणणारी आवली देऊन जाते आणि तिथचं हे नाटक वेगळ्या उंचीवर जातं...!

लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी एवढ्या कमी वयात स्वत:ची जी काही छाप नाटकात पाडली आहे ती कौतुकास्पद आहे. माणसातील देवत्व आणि देवातील माणूसपण त्यांनी या नाटकाच्या निमित्ताने ऐरणीवर आणले आहेत. आवली आणि रखूमाई यांच्यातील संवाद-विसंवादातून, त्यांच्या स्वगतांतून, पतीशी होणाऱ्या त्यांच्या अप्रत्यक्ष संवादांतून लौकिक-अलौकिकाशी असलेले नाते, त्यांनी नितांत सुंदरपणे समोर आणले आहेत. नाटकाचे निर्माते भद्रकाली प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा प्रसाद कांबळी यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच.

या नाटकाला स्वत:ची अशी लय आहे. संगीत नाटकांच्या सगळ्या कथीत प्रथा परंपरा मोडून हे नाटक तुम्हाला वेगळा समृध्द अनुभव देतं. हे नाटक जेवढं लेखक, दिग्दर्शकाचं आहे, तेवढंच ते आवलीची भूमिका करणाऱ्या शुभांगी सदावर्ते आणि रखुमाईची भूमिका साकारणाऱ्या मानसी जोशी यांचही आहे. या दोघींनी जे काम केलंय त्याला तोड नाही.  प्रदीप मुळे यांचे नेपथ्य, प्रफुल्ल दीक्षित यांची अफलातून प्रकाशयोजना, आनंद ओक यांचे मनाचा ठाव घेणारे संगीत ही या नाटकाची बलस्थानं आहेत. सुखी संसाराची गुरुकिल्ली सांगणारं हे नाटक परत परत पहायला हवं एवढं ते आशयघन आहे. त्यासाठी निर्माते प्रसाद कांबळी, लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि शुभांगी सदावर्ते व मानसी जोशी यांना खूप खूप शुभेच्छा..!!

Web Title: Devababhali music that gives superhuman experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Theatreनाटक