“सरकारचे अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 05:20 PM2024-02-27T17:20:43+5:302024-02-27T17:23:45+5:30

Congress Nana Patole On Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: मोदींची गॅरंटी फसवी आहे. त्यांच्या पावलावर चालणाऱ्या महायुती सरकारच्या गॅरंटीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

congress nana patole reaction over maharashtra assembly interim budget session 2024 | “सरकारचे अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस”; नाना पटोलेंची टीका

“सरकारचे अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole On Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. ज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. राज्याच्या सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. 

महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजासमाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारचे हे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

कशाचाही फायदा सर्वसामान्य जनतेला होणार नाही

सरकारने कोणत्या विभागाला किती रुपयांची तरतूद केली याच्या मोठ्या घोषणा केल्या. परंतु सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता यातील कशाचाही फायदा सर्वसामान्य जनतेला होणार नाही. राज्यातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे. पण सरकार त्यांना मदत करत नाही. मागील काळात जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. राज्यातील तरुण रस्त्यावर आहेत. नोकरी भरती होत नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारने तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. महिला सक्षमीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या पण क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित आहेत हे सर्वांना माहिती आहे. हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत. महिला अत्याचार वाढले आहेत, सरकार खरेच महिला सक्षमीकरणाबद्दल गंभीर असते तर महिला अत्याचार वाढले नसते, या शब्दांत नाना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही

सरकार प्रत्येक अधिवेशनात पुरवण्या मागण्या आणते पण त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर मिळत नाही. सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही, राज्यावर कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. ‘ऋण काढून सण साजरा’ करण्यासारखा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पूरक असा अर्थसंकल्प असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. कारण मोदींची गॅरंटीच फसवी आहे तर मोदींच्या पावलावर चालणाऱ्या या महायुती सरकारच्या गॅरंटीवर तरी कोण विश्वास ठेवणार? असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. 
 

Web Title: congress nana patole reaction over maharashtra assembly interim budget session 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.