Completed 200 meter tunnel of Metro 3! | मेट्रो ३च्या २०० मीटर बोगद्याचे काम पूर्ण!

मुंबई : कुलाबा ते सिप्झ या मेट्रो ३च्या कामाने आता वेग पकडला असून, येथे नयानगरसह एकूण २०० मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासह गिरगावातील मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
मेट्रो ही मुंबईकरांच्या पुढील ५० वर्षांसाठीची तरतूद आहे. प्रथम आझाद मैदान येथील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सुमारे १५० मीटर खाली प्रत्यक्ष बोगद्यात उतरून, या सर्व कामाची माहिती अश्विनी भिडे यांनी जाणून घेतली. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे मुंबईकरांची गैरसोय होत आहे. मात्र, त्यातूनच भविष्यात मोठे काम उभे राहणार आहे. प्रत्यक्ष काम पाहिल्यावर इंजिनीरिंगच्या कामाचा हा अविष्कार असल्याची अनुभूती येते. मेट्रो मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजी अली, माहिम दर्गा, चैत्यभूमी आणि माहिम चर्च अशा सर्व धार्मिक स्थळांना जोडणार आहे, तसेच ती मोठ्या रुग्णालयांनाही जोडणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाºया पर्यटकांना सुविधा होईलच, शिवाय मुंबईकरांचीही गैरसोय दूर करणारी आहे.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करत, ही मेट्रो मुंबईकरांची भविष्य आहे, अशा भावना व्यक्त केल्या. या पाहणी दौºयात अश्विनी भिडे यांसह मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. पश्चिम उपनगरातील मुंबईकर कोणत्याही अडथळ्याविना या मेट्रोमुळे कुलाब्यापर्यंत येईल. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाचीच ठरेल, अशा प्रतिक्रिया संबंधित आमदारांनी व्यक्त केल्या.