बाजारावर बाप्पाची मोहिनी, मुंबईत जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढालीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:56 AM2018-09-09T04:56:21+5:302018-09-09T04:56:34+5:30

बाप्पाच्या आगमनाची मोहिनी बाजारावर पडली आहे.

Bappa Mohini on the market, the approximate cost of around Rs. 1,000 crore in Mumbai | बाजारावर बाप्पाची मोहिनी, मुंबईत जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढालीचा अंदाज

बाजारावर बाप्पाची मोहिनी, मुंबईत जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढालीचा अंदाज

Next

- चिन्मय काळे
बाप्पाच्या आगमनाची मोहिनी बाजारावर पडली आहे. यंदा जीएसटीच्या दरात घट झाल्याने मूर्ती तयार करण्याचा खर्च तुलनेने कमी झाला आहे. पण महागाईत वाढ होत असल्याने मूर्र्तींच्या किमतीत वाढ झाली आहेच. एकंदर विचार करता मुंबईतील यंदाचा बाप्पाचा बाजार साधारण १ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज मांडला जातोय.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी तशी सहा महिने आधी मूर्ती तयार करण्यापासून होत असते. मुंबई परिसरात जवळपास २५०० नोंदणीकृत मंडळे आहेत. या मंडळांच्या मूर्ती उंच असतात. ११ फुटांच्या मूर्तीची किंमत साधारण २५,००१ रुपयांपासून सुरू होते. काही मंडळे व त्यांच्या मूर्ती ‘प्रेशियस’ श्रेणीत गणल्या जातात. त्यांची किंमत लाखात आहे.
मूर्तिकार अशोक गुंजन यांच्यानुसार, सार्वजनिक मंडळांची ११ फूट उंच पीओपी मूर्ती तयार करण्यासाठी १५ पोती पीओपीची गरज असते. हे २५ किलोचे एक पोते २०० रुपयांचे होते. त्यानुसार ११ फूट उंच मूर्तीसाठी पीओपीचाच किमान खर्च तीन ते साडेतीन हजार रुपयांच्या घरात असतो.
अशा उंच गणेशमूर्ती प्रामुख्याने सार्वजनिक मंडळात बसविल्या जातात. गल्लीबोळांतील सार्वजनिक मंडळे वगळता मुंबई शहरातील नोंदणीकृत मंडळांपैकी १५०० ते १७०० मंडळे ११ फूट उंच मूर्ती बसवत आहेत. त्यानिमित्ताने पीओपी बाजारातच ५५ लाख रुपयांहून अधिक उलाढाल यंदा झाली.
मूर्तीसाठी लागणाऱ्या रंगांचा बाजारसुद्धा महत्त्वाचा होता. रंगरंगोटीच्या क्षेत्रातील ही उलाढाल अडीच ते तीन कोटी रुपयांच्या घरात होती. मूर्तिकार शंकर मगर यांनी सांगितले की, ११ फुटांच्या मूर्तीसाठी साधारण २० लीटर रंग लागतो. २० लीटरच्या कॅनची किंमत सध्या ४२०० ते ४४०० रुपयांदरम्यान असते. तर छोट्या घरगुती गणेशमूर्र्तींसाठी (१ ते ३ फूट) साधारण ५ लीटर रंग लागतो.
मंडळांचा खर्च १० लाख ते २ कोटी
गणेशोत्सवात मंडळांकडून किती खर्च केला जातो, याचा नेमका अंदाज बांधणे अशक्य असते. पण किमान खर्च १० लाख रुपयांच्या घरात असल्याचे मत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामध्ये मूर्ती, सजावट, ढोल-ताशा पथक व दहा दिवसांचा दैनंदिन खर्च यांचा समावेश असतो. छोटी मंडळे १० लाखांचा खर्च करतात. पण काही मोठ्या मंडळांचा हा खर्च २ कोटी रुपये असतो. त्यांची मूर्तीच लाखात असते. मंडळांचा सरासरी खर्च ३० लाख रुपये असतो. मुंबईतील २५०० नोंदणीकृत मंडळांचा विचार केल्यास या माध्यमातून किमान ७५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते, असा अंदाज आहे.

Web Title: Bappa Mohini on the market, the approximate cost of around Rs. 1,000 crore in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.