अपघात रोखण्यासाठी सुरक्षेबाबत आग्रह हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:03 AM2019-01-31T01:03:20+5:302019-01-31T01:03:45+5:30

‘मुंबईची लाइफलाइन’ अशी ओळख असणाऱ्या उपनगरी रेल्वेचा प्रवास धोकादायक बनत चालल्याचे वाढत्या अपघातांतून दिसते.

Ask for safety to prevent the accident | अपघात रोखण्यासाठी सुरक्षेबाबत आग्रह हवा

अपघात रोखण्यासाठी सुरक्षेबाबत आग्रह हवा

Next

‘मुंबईची लाइफलाइन’ अशी ओळख असणाऱ्या उपनगरी रेल्वेचा प्रवास धोकादायक बनत चालल्याचे वाढत्या अपघातांतून दिसते. गेल्या वर्षभरात रेल्वेतून प्रवास करताना विविध अपघातांत दोन हजार ९८१ प्रवाशांचा मृत्यूू झाला, तर तीन हजार ३४९ प्रवासी जखमी झाले. सर्वाधिक एक हजार ६१९ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला. या अपघातांना ज्याप्रमाणे सुरक्षा उपाययोजनांचा अभाव कारणीभूत आहे, तितकीच प्रवाशांची बेफिकीरीही. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी दोन्ही घटकांनी सुरक्षेचा आग्रह धरणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा घेतलेला धांडोळा...

मानवी चुकाच अपघाताला अधिक जबाबदार
दर दिवशी रेल्वे अपघातांत ९ ते १५ प्रवाशांचा मृत्यू होतो. हे अपघात कसे होतात, हे न पाहता सर्व खापर रेल्वेवर फोडले जाते. या अपघातांचे प्रमाण का वाढते, याचा विचार खरेतर प्रवाशांनी करायला पाहिजे. रूळ ओलांडणे हा गुन्हा असूनही अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव गमावतात. शॉर्टकट मारणे जीवावर बेतत असूनही याला जबाबदार रेल्वेला धरणार काय? काही प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करतात व हात सटकला की खाली पडतात. काही प्रवाशांचा खांबाला धडकून मृत्यू होतो. या अपघातांना रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरणे चुकीचे नाही काय? कोणालाही नंतरची गाडी पकडायची नसते, धीरच नसतो त्यामुळे अपघात वाढत आहेत. एकंदरीत मानवी चुकाच रेल्वे अपघातांना अधिक जबाबदार आहेत. रेल्वेच्या चुकीने होणाºया अपघातांचे प्रमाण तुलनेत कमी आहे.
- अरुण खटावकर, लालबाग

गर्दीचे नियोजन करायला हवे!
सकाळ-सायंकाळच्या वेळी लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेकवेळा अपघात होऊन मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. मुंबईत नोकरीसाठी परप्रांतीयांचे लोंढे वाढत असल्याने याचा ताणही रेल्वेवर येतो. गर्दीच्या वेळेस प्रवास करताना गाडीतून पडून जीव गमवावा लागतो. मागील वर्षात रेल्वे प्रवासात मरणाºयांची आणि जखमींची संख्या चिंताजनक आहे. अनियमित रेल्वे सेवा, फलाट आणि लोकल यामधील गॅप, गर्दीच्या वेळी लोकल उशिरा येणे, नियोजित फलाटाऐवजी दुसºया फलाटावर लोकल येणे अशा विविध कारणांमुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. प्रवासी नाइलाजाने शॉर्टकट अवलंबून रूळ ओलांडून दुसºया फलाटावर जाताना रेल्वे अपघात होतो. त्यामुळे गर्दीचे नियोजन करायला हवे. यासाठी १२ डब्यांच्या गाड्या १५ डब्यांच्या करायला पाहिजेत. तसेच रेल्वे रूळ ओलांडणाºया प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. रेल्वे दरवाजा अडविणाºया प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली पाहिजे.
- मुरलीधर धंबा, डोंबिवली (प.)

‘सुरक्षित प्रवास’
यावर प्रशिक्षण द्या!
रेल्वे अपघातास कारण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष व प्रवाशांचे बेफिकीर असणे हे आहे. रेल्वे प्रशासनानेसुद्धा वाढत्या लोकसंख्येनुसार धिम्या-जलद लोकल, एक्स्प्रेस, मालगाडी यासाठी प्रत्येक अप-डाऊन दिशेने २-२ रेल्वे मार्गिकांसाठी आग्रही असायला हवे. तसेच रेल्वेच्या दुतर्फा फलाट बांधल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना चढ-उतार करणे सोपे होऊन अपघात टळतील. रेल्वेने आपल्या प्रवाशांना व कर्मचाºयांना सोशल मीडियाद्वारे मित्र-सदस्य बनवून ‘सुरक्षित प्रवास’ या विषयावर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती पाहिजे.
- गणेश पाटील, ठाणे

लोकल पकडताना संयम बाळगणे गरजेचे
लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाºया मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना अनेकांना अपघातात जीव गमवावा लागतो. लोकलचा विस्तार वाढत आहे. यासह प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तिकिटांवर स्वतंत्र अधिभार आकारला जातो. अनेक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यात ‘निळा दिवा’ बसविण्यात आला असल्याने लोकल सुरू झाल्याचे प्रवाशांना समजेल. धावपळीच्या जीवनात धावपळ करताना अपघात होतात. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळणे सर्वस्वी प्रवाशांच्या हाती आहे. प्रवाशांनी लोकल पकडताना थोडा संयम आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे. लोकलचा दरवाजा आणि फलाटामधील अंतर याकडे लक्ष दिले पाहिजे.
- अनंत बोरसे, शहापूर

सूचनांकडे कानाडोळा नको!
रेल्वे प्रवासादरम्यान होणाºया अपघातांस प्रवाशांची बेफिकीरी जेवढी कारणीभूत आहे, तेवढीच रेल्वे प्रशासनाची दर्जेदार सेवा पुरविण्यातील प्रशासकीय ढिलाईही कारणीभूत आहे. प्रवाशांनी रांगेत चढावे व उतरावे, रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी पुलांंचा वापर करावा. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. वृद्ध, अपंग, महिला, लहान मुले यांना प्रवासादरम्यान मदत करावी. तसेच रेल्वेकडून करण्यात येणाºया सूचनांकडे कानाडोळा करायची ही प्रवृत्ती बळावलेली आहे. हे प्रमाण कमी झाले तरच हे अपघात कमी होण्यास मदत होईल.
- स्नेहा राज, गोरेगाव (प.)

प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
तसे बघायला गेले तर रेल्वे अपघातांस खरे कारणीभूत रेल्वेच आहे. कारण रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असूनही प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. नेहमीच्या फलाटावर येणारी लोकल दुसºया फलाटावर आल्याने प्रवाशांना फलाट बदलताना अपघात होण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये वयस्कर, गरोदर महिला, लहान मुले यांना जास्त त्रास सोसावा लागतो. शिवाय पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडतात त्यामुळेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
- चित्तरंजन लाड, नवीन पनवेल

समन्वय वाढविणे गरजेचे
रेल्वेने आपल्या खात्यातील समन्वय वाढविला पाहिेजे. सतर्कता आणि सुरक्षा याकडे रेल्वे प्रशासन अजिबात गांभीर्याने लक्ष देत नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एकाच वेळी चढ-उतार करीत असल्याने प्रवास असुरक्षित होतो. रूळ ओलांडणे, लोकलच्या दरवाजावर उभे राहणे, सिग्नलकडे दुर्लक्ष करणे, हे सारे प्रकार प्रवाशांनी स्वत:हून मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहेत.
- कमलाकर जाधव, बोरीवली

पर्यायी वाहतूक व्यवस्था हवी!
चर्चगेट ते डहाणूपर्यंत लोकल सेवेदरम्यान अनेक अपघात होत आहेत. हे अपघात रेल्वेच्या अयोग्य नियोजनाअभावी आणि काही अंशी प्रवाशांच्या चुकीमुळे होत आहेत. या मार्गावर लोकलच्या फेºया वाढविणे आवश्यक आहे. तसेच मेट्रोचे जाळे मुंबईव्यतिरिक्त विरारपर्यंत वाढविणे गरजेचे झाले आहे. यामुळे रेल्वेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. यासह इतर सुविधा पुरवून रेल्वे प्रशासनाने लोकल फेºयांचे योग्य नियोजन करायला हवे. - दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

अपघातास रेल्वे प्रशासनासह प्रवासीही जबाबदार
मुंबईत येणारे प्रवासी लोंढे, दक्षिण मुंबईच्या विविध कार्यालयांमधील कर्मचाºयांची प्रचंड गर्दी, कार्यालयीन वेळा एकच, कमी लोकल व डबे, जीवावर उदार प्रवासी, कायद्याची अंमलबजावणी न करणारी बेफिकीर सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासन व उघडे रेल्वे फाटक हीच रेल्वे अपघातांची कारणे आहेत. यावरून होणाºया अपघातांस रेल्वे प्रशासन आणि प्रवासी हे दोघेही जबाबदार आहेत. - सुरेश वाघ, अंधेरी

शटल लोकल सुरू करा!
ठाणे ते कसारा, ठाणे ते कर्जत शटल सेवा सुरू केल्यास गर्दीवर नियंत्रण राहील. रेल्वे अपघात होणे रोजचे झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासन आपआपल्या परीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र काही प्रवासी दरवाजांत उभे राहून दुसºया प्रवाशांना आत येण्यास मज्जाव करतात. त्यामुळेही अपघात वाढत आहेत.
- नीलेश देशमुख, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन

जबाबदारीने वागणे गरजेचे
रेल्वे अपघातांस कारणीभूत प्रवासी असतात. काही प्रवासी कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडतात. त्यामुळे अपघात होतो. प्रवाशांच्या गर्दीनुसार पुलांची रुंदी वाढविणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामे केली पाहिजेत. तसेच गर्दीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षेबाबत जबाबदारीने वागल्यास अपघात कमी होतील.
- दिनेश हळदणकर, चुनाभट्टी

Web Title: Ask for safety to prevent the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.