मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

By मनोहर कुंभेजकर | Published: February 29, 2024 04:09 PM2024-02-29T16:09:29+5:302024-02-29T16:10:41+5:30

दक्षिण मुंबईतील तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

Another blow from Shiv Sena to Mumbai Congress; Three former corporators in Shiv Sena | मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

मनोहर कुंभेजकर

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी व नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावित होऊन, त्यांच्यावर विश्वास ठेऊन व शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, माजी नगरसेविका शहांना रिझवान खान व माजी नगरसेविका राबिया शैख यांनी काल रात्री वर्षा निवासस्थानी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच मेघवाल समाजाचे अध्यक्ष रवी धारिया आणि  किशोर कुमार, पदाधिकारी विनोद मकवाना यांनी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. 

यावेळेस बोलतांनाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेघवाल समाजाचे आणि आमचे नाते खूप जुने आहे. धर्मवीर आनंद दिघे होते तेव्हापासूनचे हे नाते आहे. ठाण्यामध्ये सुद्धा मेघवाल समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबईत जे डीप क्लीन ड्राइव्ह सुरु करण्यात आले होते, त्यात हे सफाई कामगार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मुंबईचे खरे हिरो हे सफाई कामगार आहेत. मुंबई स्वच्छ सुंदर करण्याचे काम हे सफाई कामगार करतात. मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतो. त्यामुळे मी मनापासून त्यांचे पक्षात स्वागत करतो आणि तिन्ही माजी नगरसेविका भगिनी यांचे देखील मी शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो. 

मुंबईमध्ये विकासाची अनेक कामे आपण सुरु केली आहेत. मुंबईत सुरु झालेली डीप क्लीन ड्राइव्ह, शहराचे सौंदर्यीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, शासन आपल्यादारी अशी अनेक उदाहरणे आहेत. आज मुंबई मोठ्या प्रमाणात बदलत आहे. डीप क्लीन ड्राइव्ह मुळे प्रदूषण देखील कमी झाले आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. खड्डेमुक्त मुंबई बनविण्यासाठी काँक्रीटचे रस्ते होत आहेत. सततच्या पावसामुळे खड्यांच्या समस्या उद्भवणार नाहीत. कोस्टल रोड होत आहे. जिथे रेसकोर्स आहे, तिथे १२० एकरच्या भागात आपण सेंट्रल पार्क उद्यान बनवत आहोत. जनतेचे पैसे कुठेही वाया जाता कामा नयेत, यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. स्वच्छ, सुंदर, हरित मुंबई बनविण्याचे आपले धेय्य आहे. सफाई कामगार हा मुंबई शहराचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना आपण प्राधान्य देत आहोत. सफाई कर्मचाऱ्यांना  जे १४,००० रुपये भाडे दिले जात आहे, ते आपण २५,००० करत आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च मुंबई महानगरपालिका करेल. तसेच त्यांच्या ४८ वसाहतींचे शासनातर्फे पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे, त्यातील २ कॉलनीचे काम सुरु झाले आहे. तसेच सफाई कर्मचारी मागील चार ते पाच पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये राहतात. ते त्यांचे राहते घर मालकी हक्काने त्यांच्या नावावर व्हावे, ही त्यांची मागणी आहे यासाठी देखील विशेष बैठकीत प्रस्ताव ठेवणार आहोत आणि लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

आज जे नगरसेवक शिवसेनेत आले आहेत कारण त्यांना त्यांच्या विभागात चांगले काम करायचे आहे. फक्त त्यांना ती संधी आजतागायत मिळाली नव्हती. जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरेल अशी मी खात्री देतो. आज शिवसेनेमध्ये ५३ सीटिंग नगरसेवक झाले आहेत. आपले सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. जनतेला आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सरकारने जे लोककल्याणकारी काम मागील दीड वर्षांत केले. ही त्याचीच पोचपावती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

यावेळेस बोलताना  खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, सर्व ।माजी नगरसेविकांचे हार्दिक स्वागत करत आहे. मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की,मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या विभागामध्ये जास्तीत जास्त विधायक कामे करण्याची संधी मिळेल. आज मेघवाल समाज सुद्धा शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आश्वस्त करू इच्छितो मुंबईतील समस्त सफाई कर्मचारी तनाने मानाने शिवसेनेसोबत आहेत. 

Web Title: Another blow from Shiv Sena to Mumbai Congress; Three former corporators in Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.