मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:52 AM2024-05-01T10:52:01+5:302024-05-01T10:53:32+5:30
रस्त्यांची चाळण होणार नाही आणि खड्डे तसेच राहणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई :गणेशोत्सवात मूर्तिकारांनी मंडप उभारणीसाठी रस्ते किंवा फूटपाथवर खड्डे खोदल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यांची चाळण होणार नाही आणि खड्डे तसेच राहणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परिमंडळीय स्तरावर उपआयुक्त यांनी ठरविलेल्या एका विभागात सुयोग्य जागा निवडून प्रति परिमंडळ १०० टन शाडू माती मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाढीव मागणी प्राप्त झाल्यास वाढीव शाडू माती खरेदी करू शकतील. मूर्तिकारांचे घर किंवा मूर्ती बनविण्याच्या जागा प्रकल्पबाधित झाल्यास अटी-शर्तीची पूर्तता करणाऱ्या मूर्तिकारास नवीन ठिकाणी पूर्वीइतक्या क्षेत्रफळाची परवानगी नव्याने अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे देण्यात येईल.
मूर्तीची उंची मर्यादित ठेवा-
१) संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्याकरिता शासनाच्या सूचनांचे पालन करणे मूर्तिकारांना बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या तांत्रिक समितीच्या निर्देशानुसार कोकोपीट, शाहूमाती, भाताच्या काड्या व त्यावर मातीच्या लेपाचा वापर हा प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय असल्याचे समोर आले.
२) पालिकेकडून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मूर्ती घडविण्याबाबत मूर्तिकारांना सुचविण्यात आले आहे. स्थापनेदर स्थापनेदरम्यान मूर्ती अखंडित राहील, एवढ्या उंचीची मूर्ती घडविण्यात यावी, असे आवाहन पालिकेकडून
करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी सहकार्य करा-
१) मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पालिका अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवीत आहे. मूर्तिकार आणि गणेश मंडळेदेखील दरवर्षी प्रतिसाद देतात. यंदाच्या गणेशोत्सवासाठीदेखील महानगरपालिका प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.
२) पर्यावरणपूरक उत्सवासाठी महापालिका प्रशासनाने विविध कामे आतापासूनच हाती घेतली आहेत.
३) मूर्तिकार, गणेश मंडळांनीदेखील हा उत्सव अधिकाधिक सुटसुटीत आणि आनंदात साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.