अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:37 AM2018-06-11T04:37:56+5:302018-06-11T04:37:56+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान विजेसंबंधी दुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते; अशा वेळी वित्त आणि मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते.

 Action plan for uninterrupted power supply | अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा

अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा

Next

मुंबई  - मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान विजेसंबंधी दुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते; अशा वेळी वित्त आणि मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी, अशा दुर्घटना घडू नयेत, वेळीत सतर्कता बाळगता यावी; यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांत विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट, महावितरण, टाटा आणि रिलायन्स या वीज कंपन्या सज्ज झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रिलायन्सने खंडित वीजपुरवठा कालावधी कमी करण्यासाठी कृती आराखडाच आखला असून, मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, म्हणून उर्वरित वीज कंपन्याही सज्ज आहेत.
रिलायन्स एनर्जीचे आपत्कालीन दक्षता कक्ष सर्व यंत्रणेसह पावसाळ्यातील आणीबाणीसाठी सज्ज आहेत. तसेच, कंपनी इतर व्यवस्थापनांशी, महानगरपालिका, विविध शासकीय आणि निमशासकीय व्यवस्थापनांशी अखंड समन्वय, सहकार्य आणि गरज भासल्यास यंत्रणांची गरज, यासाठी कंपनी दक्ष आहे.
तसेच, आपत्कालीन दक्षता कक्ष आणि महानगरपालिकेसोबत समन्वय साधण्यासाठी हॉटलाइन अस्तित्वात आहे. २४/७ पॉवर हेल्पलाइन १९१२२/१८००२००३०३० ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने गरज भासल्यास पाणी साठलेल्या भागातील ग्राहकांचा तसेच रिलायन्स एनर्जीच्या स्थापित यंत्रणांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. टाटा पॉवरनेही ग्राहकांच्या सेवेसाठी २४ तास सेवा दिली असून, यासाठी १८००२०९५१६१ हा क्रमांक देण्यात आला आहे.

या आहेत उपाययोजना

पावसाळी आराखड्याचा कृतिशील दृष्टिकोन म्हणजे संकटातून यंत्रणांची सुरक्षितता लक्षात घेऊन खंडित वीजपुरवठा वेळात पूर्ववत करणे.
आराखड्याचा भाग म्हणून गरज भासल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी साठलेल्या ठिकाणांचा जसे सबस्टेशन, मीटर केबिन आणि सखल भागातील वस्त्यांचा जीवितहानी टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जाईल.
रिलायन्सने पावसाळीपूर्व सर्व तपासणी आणि उपकरणे प्रतिबंधात्मक देखभाल पूर्ण केली आहे. सर्व आणीबाणीना प्रतिसाद देण्यासाठी जलद प्रतिसाद केंद्रे बनविली आहेत. ही केंद्रे आधुनिक वायरलेस कम्युनिकेशन सुविधा जसे की हॉटलाइन्स, रेडिओ फ्रिक्वेंसी वॉकी-टॉकी सेट तसेच आवश्यक उपकरणांसह सुसज्ज आहेत.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे हे नवे नाही. पावसाळ्यात वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून ते वाहिनीत शिरणे, वीज कोसळणे, विजेचा दाब वाढणे, यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.
अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे तसेच पाणी हे विजेचे वाहक असल्याने दुर्घटना घडतात. त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हाच उपाय आहे.
भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी कामांसाठी खोदकाम केले जाते. यात वाहिन्यांना धक्का बसतो. वाहिनीला भेगा पडतात. पावसाला सुरुवात झाली की पाणी वाहिन्यांमध्ये शिरते. परिणामी, वाहिनीत बिघाड होतो आणि वीजपुरवठा खंडित होतो.

ही काळजी घ्याच

मीटर कॅबिनेट पाणीगळतीपासून सुरक्षित जागी आहे याची खात्री करा.
जर वायरिंगमध्ये कोणताही बदल केला गेला असेल तर तो परवानाधारक इलेक्ट्रिकल कंत्राटदारांकडून पूर्णपणे तपासणी करून घेणे.
सुरक्षा शूज किंवा उष्णतारोधक प्लॅटफॉर्म न वापरता विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
मंजूर लोडपेक्षा वीज अधिक वापरू नका.
कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा.
विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा.
दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात. पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी.

वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्यात जोडू नये.
जमिनीवर पडलेल्या वीजतारांना स्पर्श करू नये.
पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युततारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्या.
पावसाचे पाणी मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे.
पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये.
विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा पाणी शिरले, तर ते त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे.

Web Title:  Action plan for uninterrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.