तुमच्या गाडीवर तिसरा डोळा, चुकलात तर खिसा कापलाच म्हणून समजा

By अतुल कुलकर्णी | Published: January 16, 2024 05:37 AM2024-01-16T05:37:57+5:302024-01-16T05:38:39+5:30

तुम्हाला येणारे बिल तुम्ही भरण्याचे टाळले तर तुमची गाडी विकता येणार नाही. वाहतूक पोलिसांनी पकडले तर हा दंड व्याजासह वसूल केला जाईल.

A third eye on your car, if you make a mistake, consider it as a pocket cut | तुमच्या गाडीवर तिसरा डोळा, चुकलात तर खिसा कापलाच म्हणून समजा

तुमच्या गाडीवर तिसरा डोळा, चुकलात तर खिसा कापलाच म्हणून समजा

मुंबई : नव्याने सुरू झालेल्या २२ किलोमीटर लांबीच्या शिवडी - न्हावा शेवा सागरी पूल अर्थात अटल सेतूवर वेगवेगळ्या अँगलने तब्बल ३७४ कॅमेरे प्रवाशांच्या वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. तुमच्याकडून कुठेही चूक झाली तर तुमच्या गाडीचा नंबर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रणेतून कॅप्चर केला जाईल. तो नंबर नंतर वाहतूक पोलिसांसह आरटीओ विभागालाही पाठवला जाणार आहे. तुम्हाला येणारे बिल तुम्ही भरण्याचे टाळले तर तुमची गाडी विकता येणार नाही. वाहतूक पोलिसांनी पकडले तर हा दंड व्याजासह वसूल केला जाईल.

या ठिकाणी १३० सर्व्हियलन्स सिस्टमचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. संपूर्ण पूल हा या कॅमेऱ्याच्या नजरेखाली असणार आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीचा अंदाज यावा, यासाठी या पुलावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राने युक्त १९० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुलावरील वाहतुकीसंदर्भात काही महत्त्वाची माहिती प्रवाशांना मिळावी म्हणून नियंत्रण कक्षाद्वारे चालविण्यात येणारे सहा व्हिडीओ बोर्डदेखील बसवण्यात आले आहेत.

अपघात प्रतिबंधात्मक योजनेसाठी २२ स्पॉट स्पीड कॅमेरे, तसेच १२ सेक्शन स्पीड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. स्पाॅट स्पीड कॅमेऱ्यामुळे तुमच्या गाडीचा नेमका वेग तुम्हालाही दिसताे आणि नियंत्रण कक्षातही नाेंदवला जाताे. पुलाच्या भोवतालच्या संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळू नये, याकरिता दृश्यबंदी पत्रेदेखील लावण्यात आली आहेत. स्ट्राबॅग कंपनीकडे हे काम देण्यात आले असून, या कंपनीने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान यासाठी वापरले आहे.

अत्याधुनिक यंत्रणा : देशातील पहिला पूल
राज्यांतर्गत रस्त्यांवर अशा पद्धतीची व्हिजिलन्स यंत्रणा उभी करण्यात आलेला देशातला हा पहिला पूल आहे. इतकी अत्याधुनिक यंत्रणा देशातल्या कुठल्याही पुलासाठी वापरण्यात आलेली नाही.

मल्टी मोड टोल पद्धती येथे बसवण्यात आल्यामुळे टोल नाक्याजवळ वाहनांना थांबण्याची गरज नाही. ते त्यांच्या वेगाने वाहन नेऊ शकतात आणि टोल नाक्यावर त्यांचा टोलदेखील कापला जाईल. 

जर तुमच्याकडे फास्ट टॅग नसेल तर तुम्ही फास्ट टॅग घ्यावा यासाठी ७२ तासांचा अवधी दिला जाईल. त्या वेळात तुम्ही तुमच्या गाडीला फास्ट टॅग बसवला नाही तर तुम्ही टोल भरला नाही असे समजून तुमचा नंबर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे जाईल.

आरटीओकडे तुम्ही टोल भरला नाही तर तुम्ही जेव्हा तुमची गाडी विकाल तेव्हा हा सगळा टोल तुमच्याकडून वसूल केला जाईल. मध्येच जर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला चलन दिले तर ते चलन भरताना या टोलसह तुमच्याकडून वसूल केले जाईल. थोडक्यात कुठल्याही मार्गाने टोल भरण्यातून तुमची सुटका होणार नाही.

सेल्फी काढत असाल तर...
पुलावर थांबून जर सेल्फी काढत असाल, निष्कारण जास्त वेळ थांबाल तर ते कॅमेऱ्यामध्ये कैद हाेईल. तुमच्या गाडीचा नंबर स्कॅन करून तो वाहतूक पोलिसांकडे जाईल. नियम मोडले म्हणून तुम्हाला दंड लागेल.

 पुलाच्या खाली तब्बल ३६ कॅमेरे लावण्यात आले असून, हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. यामुळे पुलाखालून होणारी सागरी वाहतूक हे कॅमेरे अचूकपणे टिपतील. 

Web Title: A third eye on your car, if you make a mistake, consider it as a pocket cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई