93 crore fund for development of Gharapuri | घारापुरीच्या विकासासाठी ९३ कोटींचा निधी  

मुंबई  - घारापुरी लेणी परिसराचा हरित, पर्यावरणपूरक विकास करण्यावर शासनाचा भर आहे. शासनाने लेणी परिसराच्या विकासासाठी ९३ कोटी रुपयांची योजना आखली असून, त्यातून पर्यटकांना सुविधा देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. घारापुरी लेण्यांना येत्या काळात जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवू, तसेच त्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या एलिफंटा महोत्सवालाही देश-विदेशातील पर्यटक, कला रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी सांगितले.
घारापुरी लेण्यांवर सुरू असलेल्या एलिफंटा महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात जयकुमार रावल बोलत होते. ते म्हणाले की, राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने या बेटावर आता वीजही आणली आहे. पहिल्या टप्प्यात शंभर जोडण्या देण्यात येत असून, एलिफंटा महोत्सव हा या योजनेचा पहिला ग्राहक ठरला आहे. एमटीडीसी आणि एअर बीएनबी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून, या सहभागातून एलिफंटा लेणी परिसरात राहणाºया लोकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून लेण्यांच्या परिसरात राहण्यास उत्सुक असणाºया पर्यटकांना ‘होम स्टे’ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
समारोपाच्या कार्यक्रमात ऐश्वर्या बडदे आणि स्मृती बडदे यांच्या लावण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत डॉ. परिणिता शाह यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, हंसराज हंस यांचा सुफी नाइट कार्यक्रम, नितीश भारती यांच्यामार्फत ‘स्टोरी आॅफ एलिफंटा’ या विषयावर सँड आर्टचे सादरीकरण आणि वडाली ब्रदर्स यांचा सुफी नाइट हे कार्यक्रम सादर झाले. रविवारच्या कार्यक्रमास घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल उपस्थित होते.

विविध विकासकामांची योजना

एलिफंटा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी जयकुमार रावल म्हणाले की, घारापुरी लेण्यांवर नेचर ट्रेल, हेरिटेज ट्रेल, वॉक वे, पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी मिनी ट्रेन, हेरिटेज अँपी थिएटर, नव्या जेट्टीचा विकास आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. बीपीटीने शिवडी ते एलिफंटा रोप वेचा प्रकल्प हाती घेतला आहे.