जखमा भरल्या तरी आघात कायम... मुंबईवरील हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण, दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप सतावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:59 AM2017-11-26T03:59:42+5:302017-11-26T03:59:48+5:30

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण होत असली तरी दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षांनंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत, पण या हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या मनावरील आघात अद्याप कायम आहे.

9 injured in Mumbai attack, fear of terrorist attack still annoying | जखमा भरल्या तरी आघात कायम... मुंबईवरील हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण, दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप सतावतेय

जखमा भरल्या तरी आघात कायम... मुंबईवरील हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण, दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप सतावतेय

Next

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण होत असली तरी दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षांनंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत, पण या हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या मनावरील आघात अद्याप कायम आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेबाबत अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या असल्या तरी मुंबईकरांच्या मनातील दहशतवादी हल्ल्याची भीती अजूनही घर करून बसली आहे. सीएसएमटी स्थानकावर हल्ला होऊ नही या स्थानकात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. येथील बहुतांश मेटल डिटेक्टर बंद आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटावर पुरेसे सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत. मुळात येथेच दहशतवादी अजमल कसाबने पहिला गोळीबार केला होता. हा हल्ला करण्यासाठी दहशतवादी ज्या बधवार पार्क येथे उतरले होते, तेथेही केवळ नावापुरता पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यामुळे मुंबईवर झालेल्या या हल्ल्याची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचे मत मुंबईकरांनी व्यक्त केले.

२६/११ च्या हल्ल्यात मला अपंगत्व आले. सरकारने अजूनपर्यंत औषधोपचारासाठी पैसे दिले नाहीत. हल्ल्यात माझा पाय ८० टक्के निकामी झाला. सरकारने त्या वेळेस सांगितले, जखमींना उपचारासाठी पैसे दिले जातील, परंतु आजतागायत पैशाची मदत मिळालेली नाही. आता हल्ल्याला नऊ वर्षे उलटून गेली. मात्र, उपचाराचे पैसे सरकारने दिले नाहीत. हल्ल्यानंतर मी चालू शकत नाही. त्यामुळे बेरोजगार झाले. सरकारला कित्येक पत्रव्यवहार केले गेले. परंतु कोणीच मदतीला आले नाही. हल्ल्यात मी आणि मुलगा जखमी झालो. सुरुवातीला सरकारने ५० हजार रुपयांची मदत केली. मात्र, आतापर्यंत १५ लाख रुपये उपचारादरम्यान खर्च झाले. हल्ल्यानंतर पहिले आॅपरेशन झाले तेव्हा चांगल्या प्रकारचा उपचार मिळाला नाही. त्यानंतर सैफी, बॉम्बे आणि सायन इत्यादी रुग्णालयात सहा प्रकारचे आॅपरेशन झाले. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची इतकी ताकद नाही. स्वत:कडचे दागिने, घर, मुलाचे दुकान गहाण ठेवून उपचाराचा खर्च भागवला. डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे पहिले आॅपरेशन व्यवस्थित झाले नाही. सरकारला माझी विनंती आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचे पैसे त्वरित द्यावेत. तसेच मुलांना रोजगार द्यावा.
- सबीरा खान, जखमी व्यक्ती

मी जखमींच्या व मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची मदत करण्यासाठी आली होती. मी मूळ अहमदाबादची आहे. चार महिने जे.जे. रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत होती. सेंटोलॉजी गुजरात फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही २६/११ च्या हल्ल्यात सापडलेल्या लोकांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम करत होता. त्या वेळी आम्ही वेगवेगळ्या टेक्निक वापरून पीडितांना आधार दिला. टच थेरेपी देण्यात आली. या लोकांना खूप मोठा मानसिक धक्का पोहोचलेला होता. त्यातून बाहेर येणे हे सहजासहजी शक्य नसते. तर त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहेर आणायचे काम आम्ही करत होतो. प्रत्येक रुग्णाकडे जाऊन वेगवेगळ्या थेरेपी देऊन त्यांना बरे करत होतो.
- सोना शर्मा, सेंटोलॉजी गुजरात फाउंडेशन

मुंबई पोलिसांनी संकटाचा सामना केला. यात त्यांना यश आले. हेमंत करकरे, अशोक कामटे हे ज्या पोलीस व्हॅनमध्ये होते; त्याच व्हॅनमध्ये मी होतो. कामटे साहेब नियोजन करत होते. पण अचानकपणे कसाबने व्हॅनवर हल्ला केला. त्याला उत्तर देण्यात आले. पण आमचे अधिकारी शहीद झाले. मला पाच गोळ्या लागल्या. त्याच अवस्थेत मी पोलीस कंट्रोल रूमला कसाबची माहिती दिली. कसाबला जिंवत पकडण्यात आले. आता मुंबईवर कोणताही हल्ला होऊ नये हीच आशा आणि हल्ला होऊ नये म्हणून आम्ही सज्ज आहोत.
- अरुण जाधव, जखमी हवालदार

मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचा प्रसंग घडलेला नाही. दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि मुंबई थांबली. पण आता मुंबईची सुरक्षा चांगलीच सतर्क झालेली आहे.
- प्रवीण सावंत, हवालदार

कामा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अचानक दहशतवादी रुग्णालयात घुसले आणि हल्ला केला. नक्की काय होते आहे तेच समजत नव्हते. तत्परता ठेवत रुग्णांना हलविण्यात आले. गर्भवती महिलेला नेताना माझ्या हाताला गोळी लागली. याच अवस्थेत मी रुग्णांना दुसरीकडे हलवले. हाताला गोळी लागल्याने आजही खांदा दुखतो. काम करताना त्रास होतो. आज मुंबईची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मात्र सुरक्षा कायम राहिली पाहिजे.
- हिराबाई विलास जाधव,
जखमी, कामा रुग्णालय

प्रसंग आठवला तर आजही अंगावर काटा उभा राहतो. माझा जवळचा मित्र हरीश गोहील याला या हल्ल्यात गमावले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी टीव्हीवर क्रिकेटचा सामना सुरू होता. सामना सुरू असताना अचानक बाहेरून मोठा आवाज आला. तो बघण्यासाठी मी व माझे मित्र बाहेर पडलो. सर्व माणसे सैरावैरा पळत होती. पुन्हा मोठा आवाज झाला. तो आवाज स्फोटाचा होता. स्फोटात मानवी शरीराचे झालेले तुकडे माझ्या अंगावर पडले. मलाही इजा झाली. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पन्नास मृतदेह होते. यात पोलिसांचाही समावेश होता. मला शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले. माझा जीव वाचला. माझा संसार सुखरूप सुरू आहे. मात्र आता असा हल्ला होऊ नये म्हणून सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
- संजय लक्ष्मण कथार, जखमी

ताज हॉटेलमध्ये रक्ताने भिजलेले कार्पेट, ४० फूट रक्ताचे ओघळ, हानी आणि वास्तूची जाळपोळ हे नुकसान पाहून राग अनावर होत होता. ताजचा पाचवा आणि सहावा मजला हा संपूर्ण लाकडाचा आहे. दहशतवाद्यांनी या मजल्यावर आग लावली. काचा फोडणे, भिंतीवर बॉम्ब टाकणे, लाकडांच्या खांबाला आग लावण्यात आली होती. दहशतवादी ६० तास ताजमध्ये होते.
- चेतन रायकर, सदस्य, मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी

माझी आई अरखाबाई सोलंकी मारली गेली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर सफाई कामगार म्हणून ती सेवेत होती. ज्या वेळी हल्ला झाला, तेव्हा आईवर सहा गोळ्या दहशतवाद्यांनी झाडल्या. त्यात ती मरण पावली. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा वाढलेली आहे. सरकारने देशाच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे.
- राजेश सोलंकी,
मृत व्यक्तीचा मुलगा

मुंबई सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण होता. मुंबईचे सागरी किनारे सुरक्षित नाहीत. माझे पती मुरलीधर चौधरी रेल्वे पोलीस होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर कार्यरत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते शहीद झाले. मला आणि मुलांना पोरके करून गेले. राहिल्या त्या फक्त आठवणी.
- स्नेहलता चौधरी,
मृत व्यक्तीची पत्नी

 

Web Title: 9 injured in Mumbai attack, fear of terrorist attack still annoying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई