राज्यभरात २८ जणांनी केले लिंगपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:45 AM2018-05-24T01:45:01+5:302018-05-24T01:45:01+5:30

लिंगपरिवर्तनाविषयी समाजात मानसिकता बदलत असून, याविषयी जाहीरपणे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे.

28 people made transgendent in the state | राज्यभरात २८ जणांनी केले लिंगपरिवर्तन

राज्यभरात २८ जणांनी केले लिंगपरिवर्तन

Next

मुंबई : ललिता साळवे हिच्या लिंगपरिवर्तनाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजला. काही वर्षांपूर्वी लिंगपरिवर्तनाविषयी फारशी चर्चा केली जात नसे, मात्र असे चित्र असूनही गेल्या वर्षभरात राज्यात २८ जणांनी लिंगपरिवर्तन केल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.
लिंगपरिवर्तनाविषयी समाजात मानसिकता बदलत असून, याविषयी जाहीरपणे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या तपशिलानुसार, २८ व्यक्तींपैकी पुरुष असलेल्या २१ जणांवर ही शस्त्रक्रिया करून लिंगपरिवर्तन करण्यात आले. तर महिला असून पुरुष होण्यासाठी सात जणांनी या शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला. या लिंगपरिवर्तनाच्या प्रक्रियेत शस्त्रक्रियेनंतर दोन रुग्णांमध्ये गंभीर स्थिती उद्भवली, मात्र उपचारानंतर त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
याविषयी, प्लॅस्टिक सर्जन डॉ. शैलेश गवई यांनी सांगितले की, समाजातील विविध स्तरातील जनजागृतीमुळे लिंगपरिवर्तन या पर्यायाकडे सकारात्मकतेने पाहिले जात आहे. या शस्त्रक्रियांमध्ये बऱ्याचदा पुरुषाला महिला बनविण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी असते. परंतु, महिलेला पुरुष बनविताना अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असते. या संपूर्ण प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागतो. याशिवाय, शस्त्रक्रियेशिवाय मानसोपचाराची प्रक्रियाही महत्त्वाची असते. कारण काही वेळा हे रुग्ण उपचारादरम्यान किंवा नंतर मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता असते. मात्र लिंगपरिवर्तनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामध्ये आलेली सकारात्मकता स्वागतार्ह आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी म्हणाले, ललिता साळवे हिला लिंगपरिवर्तनासाठी पोलीस महासंचालकांनी दिलेली परवानगी हा महत्त्वाचा निर्णय आहे. समाजातील हे बदल विविध पातळ्यांवरील जनजागृतीमुळे शक्य झाले आहेत.

Web Title: 28 people made transgendent in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.