मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. या वर्षी परदेशातून आणलेले कोल्डमिक्स खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती देईल, असा दावा पालिकेने केला होता, परंतु मुसळधार पावसाने मुंबईचे रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला तब्बल २८ मेट्रिक टन कोल्डमिक्स वापरावे लागले आहे.
पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी, इस्रायल आणि आॅस्ट्रिया येथून ३३ मेट्रिक टन कोल्डमिक्स आयात करण्यात आले होते. भर पावसात व जेथे खड्डे सातत्याने पडत असतील, त्या ठिकाणीच हे वापरले जाते. यापैकी २८ मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे पालिकेडे आता केवळ पाच मेट्रिक टन कोल्डमिक्स उरले आहे. खड्डे मात्र, मुंबईच्या रस्त्यांवर कायम आहेत.
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडू नयेत, यासाठी पालिकेने परदेशातून हे महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान मागविले होते. पावसातही हे तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजविणे शक्य होते, तसेच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत नाहीत, असा पालिकेचा दावा आहे. त्यानुसार, एकूण ३३ मेट्रिक टन कोल्डमिक्स खरेदी करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने, पावसात असे रस्ते उखडले गेले.

खड्डे मोजणारी यंत्रणाच गायब
महापालिकेच्या कारभाराची पोलखोल करणारे व्हाइस आॅफ सिटिजन हे संकेतस्थळ बंद करण्यात आले. मात्र, नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणारी एकही यंत्रणा नसल्याने, पालिकेने व्हॉट्स अ‍ॅप व हेल्पलाइनवर तक्रार घेण्यास सुरुवात केली, तसेच प्रत्येक वॉर्डातील रस्ते अभियंताला विशेष मोबाइल क्रमांक देऊन, तक्रार घेण्यास सांगण्यात आले आहे.

प्राधान्याने रस्तेदुरुस्ती
महापालिकेने या वर्षी सुमारे आठशे रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. प्रत्येक विभागात तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार, रस्त्यांचे प्राधान्य क्रम ठरविण्यात आले.
यामध्ये पावसाळ्यात खड्डे पडण्याची दाट शक्यता असलेल्या ११० रस्त्यांची, तातडीने दुरुस्ती करण्यासाठी त्यांचे प्राधान्य क्रम एक ठरविण्यात आला, तर पावसाळ्यात काही दिवस तग धरू शकणाºया २४८ रस्त्यांचे प्राधान्य क्रम २ ठरविण्यात आले.

रस्तेदुरुस्तीची आकडेवारी
प्रकार रस्ते
प्राधान्य- १ ११०
प्राधान्य- २ २४८
प्रकल्प ४१५

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी, इस्रायल आणि आॅस्ट्रिया येथून
३३ मेट्रिक टन
कोल्डमिक्स आयात करण्यात आले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.