१,४४९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये ६८ जणांनी भरलेच नाहीत

By जयंत होवाळ | Published: April 13, 2024 07:52 AM2024-04-13T07:52:27+5:302024-04-13T07:52:50+5:30

१०९ पैकी ४१ जणांनी भरले अवघे ६७ कोटी रुपये

1,449 crore 25 lakh 61 thousand rupees were not paid by 68 people | १,४४९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये ६८ जणांनी भरलेच नाहीत

१,४४९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये ६८ जणांनी भरलेच नाहीत

जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका मालमत्ता कर थकविणाऱ्या ‘टॉप टेन’ची यादी प्रसिद्ध करत आहे. त्यातील १०९ थकबाकीदारांपैकी ६८ बड्या धेंडांनी थकबाकीचा एक छदामही पालिकेच्या तिजोरीत भरलेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ४१ थकबाकीदारांनी मिळून फक्त ६७ कोटी रुपयांची रक्कम भरली आहे. त्यातही फक्त भारत डायमंड बोर्स यांनी २६ कोटी २५ लाख ८६ हजार ६२२  एवढी थकबाकी १०० टक्के भरली आहे. तर उर्वरित ६८ जणांनी तब्बल १ हजार ४४९ कोटी २५ लाख ६१ हजार ७६५ रुपयांची थकबाकी भरलेली नाही.

मालमत्ता  कराच्या थकबाकीची वसुली व्हावी यासाठी पालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कर भरण्यासाठी २५ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. बडे व्यावसायिक, उद्योजक, मोठ्या गृहनिर्माण संस्था, व्यापारी केंद्रे, मनोरंजन संकुले  यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. परंतु त्यांनी पालिकेला दाद दिलेली नाही. त्यामुळे पालिकेने त्यांची यादीच जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘टॉप टेन’ थकबाकीदार आणि त्यांच्याकडे असलेली थकबाकी,  असा तपशील जाहीर केला जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही मोहीम हाती घेतली आहे. जाहीर वाभाडे निघूनही यापैकी अनेक थकबाकीदारांवर काहीही फरक पडला नसल्याचे  उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

थकबाकी मोठी, भरणा किरकोळ
अनेकांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे, परंतु त्यांनी किरकोळ रक्कम भरली आहे. उदाहरणार्थ सेऊलजी प्रॉपर्टी विनियोग ली. ग्रॅण्ट हयात प्लाझाकडे २४ कोटी ८९ लाख ६९५ रुपयांची थकबाकी असून त्यापैकी त्यांनी फक्त पाच कोटी ६६ लाख ३५ हजार ८०६ रुपये भरले आहेत.

लोकमतच्या हाती १०९ थकबाकीदारांचा तपशील असून या सगळ्यांकडे मिळून १ हजार ५१६ कोटी ४१ लाख ८६ हजार २७०  एवढी थकबाकी आहे. त्यापैकी फक्त ६७ कोटी १६ लाख २४ हजार ५०५ एवढ्या रकमेचा भरणा झाला आहे. 

n मे. हिंदुस्थान प्लॅटिनम लि. : थकबाकी १० कोटी १५ लाख ९४ हजार, 
भरले : १ कोटी 
n रघुवंशी मिल : 
थकबाकी : ७१ कोटी २३ लाख ६५ हजार, 
भरले : २३ लाख ५४ हजार 
n अर्नेस्ट जॉन : 
थकबाकी : ११८ कोटी ९८ लाख १३ हजार, 
भरले : ९१ लाख ५२ हजार
n एचआयडीएल: थकबाकी: ५३ कोटी १२ लाख, 
भरले : २ कोटी ३६ लाख 
n शुभदा या आमदारांच्या गृहनिर्माण सोसायटीकडे १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० एवढी थकबाकी आहे. त्यांनी छदामही भरलेला नाही.

Web Title: 1,449 crore 25 lakh 61 thousand rupees were not paid by 68 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.