- सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गेल्या ३ वर्षांत ५0 टक्क्यांनी कमी झाले असताना, भारतात मात्रस पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या किमतींनी मंगळवारी उच्चांक गाठला. मुंबईत पेट्रोलची ७९.४१ रुपये, तर दिल्लीत ७0.३८ रुपये दराने विक्री झाली. चेन्नई व कोलकत्यातही भाव असेच चढे आहेत. या दरवाढीवर सर्वत्र टीका सुरू होताच, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी लगेच संबंधितांची बैठक बोलावली, पण त्यातून दरवाढ कमी करण्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.
इंडियन आॅइल, हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्या आयात कच्च्या तेलाचे रिफाइंड इंधनात रूपांतर करतात. त्यांना ते २१.५0 रुपये दराने मिळते. कच्च्या तेलावरील रिफायनरीचा खर्च, एन्ट्री टॅक्स, लॅडिंग खर्च व प्रक्रियेतले अन्य खर्च यांची बेरीज साधारणत: ९.३४ रुपये प्रतिलीटर आहे. याचा अर्थ पेट्रोल उत्पादनाचा खर्च ३१ रुपये आहे.
ग्राहकांना मात्र, पेट्रोलसाठी ८0 रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने २0१४ पासून ३ वर्षांत पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी १२६ टक्क्यांनी, तर डिझेलवरील ड्युटी ३७४ टक्क्यांनी वाढविली. राज्यांनी कर वाढविले. त्यामुळे केवळ करापोटीच ४९ रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या दरांसाठी डायनॅमिक फ्युएल प्राइस फॉर्म्युला १६ जून २0१७ रोजी लागू झाला, तेव्हा दिल्लीत पेट्रोलचा दर ६५.४८ रुपये, तर डिझेलचा ५४.४९ रुपये होता.
इंधनाच्या दरांचे रोज मूल्यांकनाचा डायनॅमिक फ्युएल प्राइस फॉर्म्युला सुरू करताना, धर्मेंद्र प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भावानुसार ग्राहकांना थेट लाभ मिळेल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात हा निर्णय लागू झाल्यानंतर, पेट्रोल व डिझेलच्या दरात सतत वाढच होत गेली.
ग्राहकांना फायदा नाहीच
बाजारपेठेत १३ डिसेंबर २0१६ रोजी कच्च्या तेलाचे दर ३,0९३ रुपये प्रतिबॅरल होते, तर २0१४ साली बॅरलची किंमत तब्बल ६ हजार रुपयांच्या जवळपास होती. कच्च्या तेलाचे भाव निम्म्यावर येऊ नही त्याचा फायदा सरकारने ग्राहकांना मिळवून दिलेला नाही.

हा अमेरिकेतील
वादळाचा परिणाम

पेट्रोल व डिझेलचे भाव कमी व्हावेत, अशी मागणी होत असली, तरी त्यासाठी सरकार मध्यस्थी करणार नाही, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत झालेल्या वादळांमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून, त्या हळूहळू कमी होतील, असे ते म्हणाले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.