नुकताच अदानी समूहाबाबत एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता. अदानी समूह (Adani Group) लाचखोरीत सहभागी नाही ना याचा तपास अमेरिकन न्याय विभाग करत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. याबाबत अदानी समूहाच्या कंपन्यांनी शेअर बाजारांना माहिती दिली. अदानी समूहाच्या कंपन्यांना या तपासाबाबत अमेरिकेच्या न्याय विभागाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नसून हा रिपोर्ट खोटा असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. १८ मार्च रोजी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला.
ब्लूमबर्गनं गेल्या आठवड्यात एक रिपोर्ट प्रकाशित केला होता, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, 'अमेरिकन अधिकाऱ्यांनी अदानी समूहाच्या चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. अदानी समूहाची कोणतीही कंपनी आणि तिचे संस्थापक गौतम अदानी यांचा भारतात ऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात हात होता का, हे शोधण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. न्यू यॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसाठी यूएस ॲटर्नी ऑफिस आणि वॉशिंग्टनमधील न्याय विभागाच्या फसवणूक युनिटद्वारे तपास हाताळला जात आहे,' असं यात नमूद करण्यात आलं होतं.
काय दिलेलं स्पष्टीकरण?
'आमच्या चेअरमनविरोधात कोणत्याही चौकशीची माहिती नाही. शासनाच्या सर्वोच्च मापदंडांसह कार्य करणारा एक व्यावसायिक समूह म्हणून, आम्ही भारत आणि इतर देशांमधील भ्रष्टाचार विरोधी आणि लाच विरोधी कायद्यांच्या अधीन आहोत, आम्ही त्यांचं पूर्ण पालन करतो,' असं तेव्हा अदानी समूहानं म्हटलं होतं. आता समूहानं लाचखोरीच्या तपासाचा रिपोर्ट खोटा असल्याचं म्हटलं आहे. या रिपोर्टचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवरदेखील दिसून आला होता.