lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यास जन्मठेप

विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यास जन्मठेप

पाच कोटींचा दंड : नव्या कायद्यानुसार देशातील पहिली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:31 AM2019-06-13T03:31:15+5:302019-06-13T03:31:49+5:30

पाच कोटींचा दंड : नव्या कायद्यानुसार देशातील पहिली शिक्षा

Life imprisonment for business threatening aircraft hijacking | विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यास जन्मठेप

विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यास जन्मठेप

अहमदाबाद: दीड वर्षापूर्वी मुंबईहून दिल्लीकडे निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे अपहरण करून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेण्याची खोटी धमकी दिल्याबद्दल एनआयएच्या न्यायालयाने मंगळवारी बिरजु किशोर सल्ला या मुंबईच्या व्यापाºयास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सन २०१६च्या अतिशय कडक विमान अपहरण प्रतिबंधक कायद्यानुसार झालेली ही पहिलीच शिक्षा आहे.
न्या. एम. के. दवे यांनी ३८ वर्षाच्या सल्ला यास पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम वसूल झाल्यास त्यातून त्यावेळी विमानात असलेल्या दोन वैमानिकांना प्रत्येकी एक लाख रुपये, तीन हवाई सुंदरींना प्रत्येकी ५० हजार रुपये व ११६ प्रवाशांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई म्हणून दिले जावेत, असाही आदेश न्यायालयाने दिला.

न्यायालयाने सल्ला यास दोषी ठरविल्यानंतर ‘एनआयए’ प्रॉसिक्युटर नीता गोडांबे व अ‍ॅड. मुकेश कापडिया यांनी सल्ला यास जन्मठेप देण्याखेरीज त्याची स्थावर-जंगम मालमत्ताही जप्त करावी, अशी विनंती केली. शिक्षेवर सल्ला याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. निकालपत्र मिळाल्यानंतर त्याविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे अ‍ॅड. डी. पी. किनारीवाला यांनी सांगितले.
३० आॅक्टोबर २०१७ रोजी मुंबईहून दिल्लीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात बिरजू सल्ला ‘बिझनेस क्लास’चा प्रवासी होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाच्या स्वच्छतागृहातील कचºयाच्या डब्यात टंकलिखित कागद हवाईसुंदरींना मिळाला. तो सल्ला याने टाकला होता. ‘१२ सशस्त्र अपहरणकर्ते विमानात आहेत व त्यांनी सामान ठेवायच्या जागेत बॉम्बही ठेवले आहेत. विमान कुठेही न थांबविता थेट पाकव्याप्त काश्मीरकडे वळवावे. विमान खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यास प्रवाशांना ठार केले जाईल.’ अशा मजकूर चिठ्ठीत लिहून ‘अल्ला हू अकबर’ने त्याची शेवट केला होता. ही चिठ्ठी सापडताच वैमानिकाने विमान तातडीने अहमदाबादला उतरविले. विमानतळावर आधी सूचना दिली गेली होतीच. प्रवासी विमानातून बाहेर पडताच पोलिसांनी सल्ला याला अटक केली. पुढे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे वर्ग केला गेला व त्यांनी २२ जानेवारी २0१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. खटल्याचा निकाल होईपर्यंत सल्ला यास साबरमती येथील तुरुंगात ठेवण्यात आले. सल्लाचे नाव ‘नो फ्लार्इंग लिस्ट’मध्ये टाकल्याने त्याला यापुढे विमानाने प्रवास करता येणार नाही.

मैत्रिणीसाठी दिली धमकी!
आरोपपत्रानुसार सल्ला याने मैत्रिणीने दिल्ली सोडून कायम मुंबईत यावे, यासाठी हे कुभांड रचले. सल्लाची मैत्रीण जेट एअरवेजमध्येच दिल्लीत नोकरीला होती, पण तिची मुंबईला बदली होत नव्हती. अपहरणाचे नाटक केल्यास जेट एअरवेज बदनाम होईल व त्यांचे दिल्लीतील कामकाज बंद झाल्यावर मैत्रीण पुन्हा मुंबईला येईल, असा सल्लाचा विचार होता.

Web Title: Life imprisonment for business threatening aircraft hijacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.