Listen to me, listen to me | मनाचं ऐका, मनातलं बोला

- स्नेहा मोरे

डिजिटल युगाची क्रांती जितक्या झपाट्याने होतेय, तितक्याच वेगाने लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच याचा भाग झालो आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामुळे अवघे जग तळहातावर सामावले, मात्र याच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्याच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल युगातील हे ‘मनोविकार’ भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रासमोर नवे आव्हान म्हणून उभे राहणार आहे. परंतु, या आजारांना घाबरुन न जाता, त्याविषयी न्यूनगंड न बाळगता स्वत:च्या ‘मन की बात’ ओळखून मनोविकारांवर मात करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या प्रभावामुळे तरुणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आपण सगळ्यांनीच वाचली किंवा पाहिली असतील. एकूण टीनएज किंवा कुमारवयात आत्महत्या, हिंसा या गोष्टींचे प्रमाण वाढत चालल्याचे अनुभवत आहोत.
आत्महत्या हा सुद्धा हिंसेचाच एक भाग म्हणता येऊ शकेल. या उदाहरणांमधून कुमारवयीन मुलांमध्ये होणाºया आत्महत्या आणि त्यांच्यावरील इंटरनेटचा प्रभाव याचा अन्योन्यसंबंध किती दृढ आहेत ते दाखवतात.
भविष्यातही इंटरनेट, सोशल मीडिया आणि आॅनलाइन गेम्स या व्यसनांचे जाळे आणखीनच वाढत जाणार आहे. या इंटरनेटच्या विळख्यात तीन वर्षांच्या लहानग्यांपासून ते साठीच्या आजी-आजोबांची पिढीही प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षपणे बळी जात आहे. मात्र समाजातील हे भयाण चित्र बदलण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. आपल्या माणसाचे ऐकून घेणे, त्याला वेळ देणे हीच याची पहिली पायरी आहे, असे डॉ. मधूराज दोंडे यांनी सांगितले.
आत्महत्यांच्या गंभीर समस्येवर उपाय करताना त्यामागील हे ‘इंटरनेट व्यसन’ या महत्त्वपूर्ण कारणावरही लक्ष केंद्रित करणं तितकंच गरजेचे झाले आहे. एकूणच या कुमारवयीन पिढीला तणाव नियोजन, व्यसनाधीनता (ज्यात इंटरनेट व्यसनाचाही अंतर्भाव आहे.), लैंगिक शिक्षण, करिअर मार्गदर्शन आदी सर्वच बाबतीत शालेय, सामाजिक, वैयक्तिक स्तरांवर जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळाल्यास समस्या निवळायला मदत होईल, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरुंधती नारंगे यांनी सांगितले.