- अ. पां. देशपांडे

संगीताची भाषा सुरांची असते. भावगीतातील शब्द आपल्याला समजतात, पण शास्त्रीय संगीतात शब्दापेक्षा सुरांना महत्त्व अधिक असते. सर्व प्रकारची अभियांत्रिकीची चित्रे, मग ते इमारत बांधण्याचे असो, की एखाद्या यंत्राचे असो, ते अभियंत्यांना जसे समजते, तसे ते इतरांना समजत नाही. उपग्रहांची चित्रे रोज दूरदर्शन दाखवते, ते त्यातील तज्ज्ञांना जसे समजते, तसे ते आम जनतेला समजत नाही. वर्ष-सहा महिन्यांचे मूल रडल्यावर त्याला काय हवे अथवा त्याला काय दुखते-खुपते ते जसे त्या मुलाच्या आईला किंवा आजीला समजते, तसे ते इतरांना समजत नाही. स्वयंपाक करताना शिजणारे पदार्थ नाना प्रकारचे आवाज करतात, नाना प्रकारचे वास सुटतात, त्याचा अर्थ घरातील महिलेला बरोबर समजतो.
सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक, औरंगाबादचे डॉ. रंजन गर्गे यांनी अलीकडे ‘कम्युनिकेटिंग सायन्स - वाय फाय ते साय फाय’ या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक दिल्लीच्या आॅथर्स प्रेस ग्लोबल नेटवर्कने छापले असून, ते फक्त अ‍ॅमेझॉनतर्फेच ग्राहकांना उपलब्ध होते. या पुस्तकाच्या शीर्षकातच त्यांनी विज्ञानाच्या भाषेचा आवाका एका वाक्यात सांगितला आहे. वाय फाय असले की आपला संगणक चालतो आणि साय फाय म्हणजे सायन्स फिक्शन उर्फ विज्ञान कथा. म्हणजे व्यवहारातील सगळ्या गोष्टींपासून साहित्यातील सगळ्या वैज्ञानिक गोष्टींपर्यंतच्या सगळ्या प्रकारचे विज्ञान विषय यात आले आहेत. रंजन गर्गे यांनी जसे महाविद्यालयात शिकवले, तसे त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचे काम करून विज्ञान प्रसार केला. ते स्वत: गिर्यारोहक असल्याने त्यातली भाषाही त्यांना अवगत असून त्यावरही त्यांनी एक मोठा ग्रंथराज निर्माण केला. त्यांनी वर्तमानपत्रात विज्ञानावर अनेक लेख लिहिले, आजवर २५ पुस्तके लिहिली, आकाशवाणी - दूरदर्शनवर कार्यक्रम केले. याशिवायही बरेच काही केले, त्यामुळे असे पुस्तक लिहिण्याचा त्यांना मोठा अधिकार प्राप्त झाला आहे. प्रस्तुतचे पुस्तक लिहीत असताना त्यांना काही चिंता भेडसावतात. त्या अशा की, विज्ञानाचे कार्यक्रम किती लोक ऐकतात, त्याचा लोकांवर नेमका काय परिणाम होतो, हे लोक विज्ञानाची पूजा करतात की, त्यामुळे त्यांच्या वर्तनात काही बदल घडतो, विज्ञानाचे प्रयोग बघून त्यामागचे तत्त्व ते समजावून घेतात की ती एक जादू आहे असे समजतात आणि राष्ट्रीय धोरणात विज्ञान काही प्रभाव पाडते का, विज्ञान प्रसारामुळे काही वैज्ञानिक अंधश्रद्धा कमी होतात का, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार होतो का, लोक एखादी गोष्ट विश्लेषणात्मक नजरेने पाहतात का?
प्रस्तुतच्या पुस्तकात वैज्ञानिक प्रश्न, विज्ञान विषयावर लेख लिहिणे, विज्ञान पत्रकारिता, वर्तमानपत्रवाल्यांची सामाजिक जबाबदारी, विज्ञान प्रसारक संस्था आणि स्वयंसेवी संस्था, समाजमाध्यमे, लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवणे, समाजाचे आरोग्यविषयक प्रश्न, विज्ञान कथा लेखन असे अनेक विषय तपशीलवारपणे हाताळले आहेत. जे जे वैज्ञानिक शोध लावतात, त्या सर्वांनाच आम जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत आपल्या शोधाबद्दल लिहिता येत नाही. यासाठी विज्ञान प्रसारकांची गरज असते. शिवाय हे समजावून सांगणे सर्व वयाच्या लोकांना सांगता आले पाहिजे. गेली २० वर्षे बीएआरसीचे एक शास्त्रज्ञ डॉ. सुधीर थत्ते आणि त्यांच्या पत्नी नंदिनी थत्ते हे दाम्पत्य नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नोबेल नगरीच्या कथा या शीर्षकाखाली ग्रंथाली प्रकाशना-मार्फत पुस्तके छापून शालेय मुलांना हे शोध समजावून सांगत असतात.

प्रत्येक गोष्टीची एक भाषा असते. उदा. पक्ष्यांचा कलरव चालू असतो. संध्याकाळी सगळे पक्षी एखाद्या झाडावर जेव्हा जमतात व तेथे वस्ती करतात, तेव्हा ते आवाज करतात. आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. एखादा कावळा मेला की असंख्य कावळे तेथे जमतात व खूप आवाज करतात, तो त्यांचा शोक असतो. आपल्याकडे एखाद्याचा मृत्यू झाल्यावर जशी घरची माणसे रडून शोक व्यक्त करतात, तसेच हे काहीसे असते. तर्काने हे आपण ओळखले तरी आपल्याला त्याचा नक्की अर्थ समजलेला नसतो.

प्रत्येक व्यवसायाची म्हणून काही विशिष्ट भाषा असते. ती दरवेळी शब्दांतून व्यक्त होईल असे नाही. उदा. खाद्य पदार्थ तयार झाल्यावर त्याची चव घेऊन तो ठीक झाला का, हे सांगणारे लोक त्यांच्या हावभावाने अनेक गोष्टी सांगत असतात. ही म्हटले तर सगळी विज्ञानाची भाषाच आहे. एखादा माणूस विज्ञान कथेतून एखादी संकल्पना समजावून सांगतो किंवा आयुकाचे डॉ. संजय धुरंधर हे गुरुत्त्वीय लहरींबद्दल जे सांगतात तीही विज्ञानाचीच भाषा असते; किंवा वर्गात विज्ञानाचे शिक्षक आॅक्सिजन कसा करायचा ते शिकवत असताना जी भाषा वापरतात, तीही विज्ञानाचीच भाषा.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.