विवाहपूर्व मार्गदर्शन करणे ही मूलभूत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:01 AM2018-04-01T00:01:56+5:302018-04-01T00:01:56+5:30

The basic requirement for pre-marital guidance | विवाहपूर्व मार्गदर्शन करणे ही मूलभूत गरज

विवाहपूर्व मार्गदर्शन करणे ही मूलभूत गरज

- डॉ. मिन्नू भोसले

पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपल्या देशातही घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे. वैवाहिक जीवनातील ताणतणाव, तंटे यामुळे शरीर व मनोस्वास्थ्यावर होणारे परिणाम यांचे प्रमाणही सातत्याने वाढताना दिसते आहे. परिणामी, याला वेगवेगळी कारणे आहेत, परंतु वैवाहिक आयुष्य सुकर करण्यासाठी सध्याच्या पिढीला विवाहपूर्व मार्गदर्शन करणे ही आजची मूलभूत गरज आहे. ज्या वेळेस आपण आता मॉडर्न झालो आहोत, असे म्हणतो, त्या वेळी आपल्यात ही सूज्ञता यायला हवी. आपण विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचविषयी आज जाणून घेऊ या.

विवाह ठरविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
विवाह ठरविताना आपण जात-धर्म, उंची, शिक्षण, जन्मकुंडली जुळवतो, पण स्वभाव, आवडीनिवडी, वैचारिक पातळी, लैंगिक क्षमता, मानसिक संतुलन, शारीरिक निकोपता यांची जुळवाजुळव होते का, याकडे फारसे लक्ष देत नाही. ही दुर्लक्षित बाजू विचारात घेतली पाहिजे, यामुळे भविष्यातील भांडण-तंटे कमी होऊ शकतात, पण यातून मार्ग निघावा, म्हणून विवाहपूर्व मार्गदर्शन तपासणी सुरू झाली आहे. याचा अवलंब आजच्या पिढीने केला पाहिजे.

कोणत्या शारीरिक तपासण्यांची आवश्यकता असते?
विवाहापूर्वी काही शारीरिक तपासण्या करून घेणे हा विचार मला आग्रहपूर्वक मांडावासा वाटतो. या तपासण्यांद्वारे एड्स, हेपेटायटिस बी, सिफिलिस इ. घातक रोगांची तपासणी केली जाते. रक्तगट जुळविणे, वीर्य तपासणी, सोनोग्राफी, थॅलेसेमियाचे ट्रेट्स आहे का, याची तपासणीही केली जाते. अशा अनेक शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चाचण्या केल्या जातात. यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा एकाच ठिकाणी उपलब्धही असते.

शारीरिक तपासण्यांसोबतच मानसिक जडणघडणीसाठी मार्गदर्शन होते का?
कुंडलीत मंगळ आहे की नाही, हे पाहण्यापेक्षा रक्तात एचआयव्ही आहे की नाही, हे पाहणे जास्त गरजेचे आहे व वास्तववादी आहे. कुंडलीत मंगळ असल्याचे दुष्परिणाम होतीलच असे नाही, पण रक्तात एचआयव्ही असल्यास मात्र खात्रीने होतील, हे विज्ञानवादी सत्य समजून घेतले पाहिजे. शारीरिक तपासण्यांखेरीज तरुण-तरुणींमध्ये वैवाहिक सहजीवनाबाबत एक जबाबदार अशी पार्श्वभूमी निर्माण करणेही आवश्यक आहे. त्यात मग लैंगिक शिक्षण देणे, व्यावहारिक समतोलाची प्रासंगिक जाणीव करून देणे, स्त्री-पुरुष मानसिकतेविषयी अधिक सांगणे, लैंगिक समज-गैरसमज, समस्या निवारण कौशल्य, संततीनियमनाची शास्त्रोक्त माहिती हे सर्व या वेळी समजावून सांगण्यात येते.

Web Title: The basic requirement for pre-marital guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई