पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:44 AM2024-05-20T10:44:23+5:302024-05-20T10:44:47+5:30

पर्वती विधानसभा मतदारसंघात २४ पैकी २१ नगरसेवक असून भाजपचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीने लोकसभेची गणिते बदलणार

BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split | पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पुणे : पर्वती मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे, तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे येथे ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी’ अशीच लढत होणार आहे. या मतदारसंघाने भाजपला नेहमीच आघाडी दिली आहे; पण शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष फुटीचा परिणाम या मतदारसंघात होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मिळणाऱ्या मताधिक्यावरच उमेदवारीचे गणित अवलंबून असणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघ २००४ पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव होता. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला. पर्वती मतदारसंघात मध्यमवर्गीयांसह ‘हाय प्रोफाइल’ सोसायट्या आणि मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या सहकारनगर, लक्ष्मीनगर, मित्रमंडळ, पर्वती दर्शन या नवी पेठ-पर्वती, सॅलिसबरी पार्क, मार्केट यार्ड, वडगाव बुद्रुक, हिंगणे, जनता वसाहत आणि दत्तवाडी हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो.

२०१९ मध्ये घटले हाेते मताधिक्य

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते; पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मताधिक्यात घट होऊन ते ३६ हजार ७२८ झाले. २०१९च्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघात एक लाख ७३ हजार ७२८ मतदान झाले होते. त्यामध्ये २५० पोस्टल मतांचा समावेश आहे. यापैकी मिसाळ यांना ९७ हजार १२ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली.

लाेकसभेतील उमेदवाराच्या लीडवर ठरणार उमेदवारी

या मतदारसंघातील २४ पैकी २१ नगरसेवक असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, तर कॉंग्रेसचा एक नगरसेवक आहे. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी लढत झाली आहे. या मतदारसंघात काेणत्या पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळणार, यावरच उमेदवारीची गणिते अवलंबून असणार आहे.

हे आहेत इच्छुक

आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे श्रीनाथ भिमाले, कॉंग्रेसचे आबा बागुल, अभय छाजेड, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, अश्विनी कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

...तर राजकीय स्थिती वेगळी 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट याची महायुती; तर काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप होताना महायुती आणि महाविकास आघाडी यांची दमछाक झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून कुरघोडीचे राजकारण होणार आहे. राजकीय परिस्थती बदलल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष बाहेर पडले अन् स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, तर पर्वती मतदारसंघामध्ये वेगळे चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला, तरी हा मतदारसंघ कॉंग्रेसला द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

२०२४ पुणे लोकसभेतील पर्वती विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदान - ३ लाख ४१ हजार ०५५
झालेले मतदान - १ लाख ८९ हजार १८४
मतदानाची टक्केवारी - ५५.४७ टक्के

Web Title: BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.