Sushant Singh Rajput Case: ड्रग विक्रेत्यांपासून बॉलिवूड पार्ट्यांपर्यंत; एनसीबीसमोर रियाचा कबुली जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 06:30 PM2020-09-08T18:30:28+5:302020-09-08T18:34:22+5:30

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अखेर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अटक झाली आहे. दोन दिवसांपासून रियाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू होती. आज तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली.

सायन रुग्णालयात रियाची वैद्यकीय आणि कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रियानं एनसीबीच्या चौकशीत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. तिनं अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

सुशांतसाठी ड्रग्जचा बंदोबस्त करायचे. पण मी स्वत: कधीही ड्रग्जचं सेवन केलं नाही, अशी माहिती रियानं एनसीबीला दिली.

सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करायचे. भाऊ शोविक कोणकोणत्या ड्रग विक्रेत्यांच्या संपर्कात होता, याची माहिती मला होती, अशी कबुली रियानं दिली.

१७ मार्चला जैदकडून ड्रग्सची खरेदी करण्यात आली होती. त्याची मला कल्पना होती, याचीही कबुली रियानं दिली आहे.

रिया आणि शोविक ड्रग विक्री करणाऱ्या जैदच्या संपर्कात होते. शोविक बासितकडूनही ड्रग्ज खरेदी करतो, याचीही माहिती रियाला होती.

बॉलिवूडच्या कोणकोणत्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतलं जातं, याची यादीही रियानं एनसीबीला दिली आहे. त्यामुळे आता एनसीबी सुशांतचे सहकलाकार आणि काही इतर कलाकारांचीदेखील चौकशी करणार आहे.

काही दिवसांपूर्वी रियाच्या घरी छापा टाकण्यात आला. त्यात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं एनसीबीच्या अधिकाऱ्यांची हाती लागली. त्यावरून रिया २०१७ ते २०१९ दरम्यान ड्रग विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे.

रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ड्रग्ज रॅकेटशी संबंधित फोटो, व्हिडीओ, व्हॉट्स ऍप चॅट्स आणि एसएमएस सापडले आहेत. त्यातून बॉलिवूडमधील काही बड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या रियाची याआधी अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयनं चौकशी केली आहे.