'ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं; राणेंनी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही तर...'; राऊतांचा गौप्यस्फोट

By मुकेश चव्हाण | Published: February 10, 2021 02:22 PM2021-02-10T14:22:18+5:302021-02-10T15:19:34+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे.

नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंब सोडत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना 'मातोश्रीचा चप्पल चोर' म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनीही शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी "देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली" असं वक्तव्य केलं होतं. तसंच "इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल," अशी टीका विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केली होती.

विनायक राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनायक राऊत यांनी टीका केली. ते स्वत: भाजपाच्या लाटेत दोन वेळा निवडून आले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावं. राऊत हे नॉन-मॅट्रीक आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.

तसेच नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती स्वत: माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.

नारायण राणे म्हणाले की, परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यानंतर माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले बरं. आमच्यात तेवढाच संवाद झाल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले होते. मात्र नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना एकदा नाहीत तर तीन-चार वेळा फोन केला होता, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता असा खुलासा विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले,"महाविद्यालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला तेव्हा तातडीने त्यांनी मंजुरी दिली. जे रखडलं होतं ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं. नारायण राणे यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता. म्हणून मोठ्या मनाने चौकशी करून उद्धव ठाकरे यांनी काय काम आहे अशी विचारणा केली'', असं विनायक राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्या या दाव्यानंतर नारायण राणे काय प्रत्तुत्तर देणार, याकडे आता लक्ष लागले आहे.