तेव्हा विमानतळावर आमनेसामने आले होते शाहरूख अन् समीर वानखेडे; १० वर्षांपूर्वीचा पंगा काय होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 08:28 IST2021-10-27T08:22:24+5:302021-10-27T08:28:09+5:30
अनेक बड्या सेलिब्रिटींवर कारवाईचा बडगा उगारणारे समीर वानखेडे सध्या वादात सापडले आहेत.

लक्झरी क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावून शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सध्या वादात सापडले आहेत. वानखेडेंनी केलेल्या कारवाया आणि त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रं याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर एनसीबी सक्रिय झाली. बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना समन्स बजावण्यात आली. त्यांची चौकशी झाली. यानंतर आता आर्यन खान प्रकरणामुळे वानखेडे पुन्हा चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेले गंभीर आरोप आणि क्रूझवरील कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या दाव्यांमुळे वानखेडे वादात सापडले आहेत. एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या बदलीचीदेखील शक्यता आहे.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक असलेल्या वानखेडेंनी याआधी विमानतळावरील कस्टम विभाग, सेवा कर विभागात काम केलं आहे. त्या विभागांमध्ये काम करताना त्यांनी रणबीर कपूर, अनुराग कश्यप यांच्यासारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
सध्या समीर वानखेडे शाहरूखचा मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चेत आहेत. मात्र शाहरूख आणि वानखेडे यांचं नाव एकत्र चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. १० वर्षांपूर्वीदेखील असंच घडलं होतं. मात्र ते प्रकरण शाहरूखला इतकं महागात पडलं नव्हतं.
जुलै २०११ मध्ये शाहरूख खान त्यांच्या कुटुंबासोबत भारतात परतत होता. लंडन आणि हॉलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेऊन शाहरूख सहकुटुंब विमानतळावर उतरला. त्यावेळी वानखेडेंच्या नेतृत्त्वाखालील कस्टम विभागानं त्यांना रोखलं.
शाहरूखकडे त्यावेळी २० बॅग्स होत्या. त्यावेळी वानखेडे आणि त्यांच्या पथकानं शाहरूखची बराच वेळ चौकशी केली. शाहरूखनं मर्यादेपेक्षा अधिक सामान आणलं असल्याची माहिती चौकशीतून समोर आली.
शाहरूख आणि त्याच्या कुटुंबानं नियम मोडला होता. त्यामुळे वानखेडेंनी कायदेशीवर कारवाई केली. त्यांनी शाहरूखला दीड लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. शाहरूख आणि वानखेडे त्यावेळी पहिल्यांदाच चर्चेत आले होते.
गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज विक्रेते यांच्यामधील कनेक्शन उघडकीस आलं. अनेक बड्या कलाकारांची नावं पुढे आली. त्यांची चौकशी वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालीच करण्यात आली. गेल्या वर्षभरात एनसीबीनं मुंबईसह परिसरात मोठ्या कारवाया केल्या. त्याचं नेतृत्त्वदेखील वानखेडे यांनीच केलं.