Join us  

Sachin Vaze: वाझे घाईत धमकीची चिठ्ठीच गाडीत ठेवायला विसरले अन्...; NIA चौकशीतून 'अजब गोंधळ' समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:07 PM

1 / 10
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी (Mukesh Ambani Bomb Scare) भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
2 / 10
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान पुन्हा एक महत्वाची माहिती एनाआयएच्या हाती लागली आहे.
3 / 10
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल एनआयएने मोठा खुलासा केला आहे. जिलेटीनच्या कांड्यांबरोबर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेली धमकीची चिठ्ठी स्कॉर्पिओ गाडीत ठेवणे राहून गेल्याने मुख्य आरोपी सचिन वाझे २५ फेब्रुवारीला पहाटे पुन्हा घटनास्थळी आले, अशी माहिती मिळाली असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितले आहे.
4 / 10
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला कारमायकल मार्गावर बेवारस स्कॉर्पिओ आढळली. त्यात सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुट्या कांड्या आणि ‘मुंबई इंडियन्स’चा शिक्का असलेल्या बॅगमध्ये खोवलेली चिठ्ठी आढळली होती.
5 / 10
एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. या चित्रणावरून स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाड्या मध्यरात्री कारमायकल मार्गावर थांबल्या. स्कॉर्पिओ गाडी तेथेच सोडून चालक इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. काही तासांनी संशयित आरोपी पुन्हा तेथे आले. स्कॉर्पिओ गाडी न्याहाळली आणि माघारी फिरले, असे या चित्रणावरून आढळले आहे. या वाहनांचा मुंबई, ठाण्यातील प्रवास स्पष्ट करणारे चित्रणही यंत्रणांनी मिळवले आहे.
6 / 10
स्कॉर्पिओ गाडी वाझे यांनीच चालवत आणली आणि कारमायकल मार्गावर उभी केली. काही तासांनी ते पुन्हा तेथे आले आणि माघारी फिरले, असा संशय दोन्ही यंत्रणांना होता. खातरजमा करण्यासाठी एनआयएने वाझे यांना कारमायकल मार्गावर नेऊन प्रात्यक्षिकही करून घेतले होते. त्याचबरोबरीने वाझे तेथे पुन्हा कशासाठी आले याचाही तपास एनआयएने केला, त्यानंतर त्यांना महत्वाची माहिती हाती लागली.
7 / 10
जिलेटीनच्या कांड्यांसोबत धमकीची चिठ्ठीही अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ गाडीत ठेवणे हा कटाचा भाग होता, मात्र घाईत चिठ्ठी स्कॉर्पिओ गाडीत ठेवणे राहून गेले. ती ठेवण्यासाठी वाझे पुन्हा माघारी फिरल्याचे निदर्शनास आले. शिवाय, स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्याही वाझे यांनीच प्राप्त केल्या असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे.
8 / 10
दरम्यान, मीठी नदीतून ताब्यात घेण्यात आलेल्या डीव्हीआर आणि प्रिंटरच्या तपासाचा अहवाल सीएफएलच्या टीमने एनआय़एला दिला आहे. या रिपोर्टनुसार याच प्रिंटरमधून उद्योगपती मुकेश अंबानींना पाठविलेले धमकीचे पत्र टाईप करण्यात आले होते.हे पत्र याच प्रिंटरमधून प्रिंट करण्यात आले होते.
9 / 10
शिंदे यानेच सचिन वाझेच्या आदेशावरून 'प्रिय मुकेश भैया और नीता भाभी' असे धमकीचे पत्र टाईप केले होते. हे पत्र जिलेटिन ठेवलेल्या स्कॉर्पिओमध्ये सापडले होते. फॉरेन्सिक टीमने डीव्हीआरबाबत सांगितले की, तो डीव्हीआर वाझे यांच्या साकेत सोसायटीचा आहे. वाझेच्या सांगण्यावरून एपीआय रियाझ काझीने तो काढून आणला होता.
10 / 10
अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा, असं म्हटलं होतं.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा