Join us  

Sachin Vaze: व्यावसायिकांनी हप्ता देण्यास दर्शवली होती असमर्थता; सचिन वाझेंनी लढवली शक्कल, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 8:48 AM

1 / 6
ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे. एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या 10 हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. हिरेन कसा दिसतो, हे दाखवण्यासाठी सचिन वाझे याने 2 मार्च रोजी हिरेन यांना एका बैठकीत बोलावले. त्या बैठकीत प्रदीप शर्मा, सुनील माने हे उपस्थित होते.
2 / 6
हिरेन यांची हत्या करण्याचे काम प्रदीप शर्मा यांच्यावर सोपावण्यात आले होते. शर्मा यांनी याबाबत संतोष शेलारकडे विचारणा केली आणि त्याने हिरेन यांची हत्या करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वाझे पुन्हा शर्माला भेटला आणि त्याला या हत्येसाठी खूप मोठी रक्कम दिली, असा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.
3 / 6
हत्येपूर्वी वाझे याने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हिरेन यांना भूमिगत होण्यास तयार केले. त्यानंतर हिरेन यांनी अधिकाऱ्यांना ठाण्यातील घोडबंदर येथील सूरज वॉटर पार्कजवळ भेटण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, माने याने हिरेन यांना बरोबर घेऊन त्यांचा ताबा शेलारकडे दिला. शेलार, मनीष सोनी, सतीश मोटकरी आणि आनंद जाधव हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यानंतर या सर्वांनी हिरेन यांची हत्या करून मृतदेह ठाणे खाडीजवळ टाकला. दुसऱ्या दिवशी हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
4 / 6
सचिन वाझेने वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे. या प्रकरणी एनआयएने बोरिवलीतील एका व्यावसायिकाची साक्षही नोंदवली आहे. सचिन वाझेकडून वसुली कशा प्रकारे केली जायची याची नोंद एनआयएने बोरिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या साक्षीवरुन केली आहे.
5 / 6
आपल्या केबिनमध्ये सचिन वाझे यांनी क्राईम ब्रँचचे सोशल सर्व्हिस ब्रँचच्या एसीपी संजय पाटील यांना बोलवलं आणि झोन 1 ते झोन 12 मधल्या हॉटेल व्यावसायिकांकडून महिना पाच कोटी रुपये वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. जे लोक हप्ता देतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायची नाही असंही यावेळी ठरवण्यात आलं.
6 / 6
कोरोनामुळे आधीच नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी हप्ते देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर सचिन वाझेने त्यांच्यासमोर एक नवीन फॉर्म्युला ठेवला. लहान हॉटेल व्यावसायिकांकडून एक लाख, मध्यम व्यावसायिकांकडून दोन लाख तर चांगली कमाई करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून तीन लाख वसुलीचे आदेश दिले. या वसुलीची जबाबदारी काही हॉटेल व्यावसायिकांवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आपण 28 लाखांचा पहिला हप्ता हा 18-19 डिसेंबरला दिला आणि त्यानंतर 23 डिसेंबरला 13 लाख रुपये दिले. आणखी एका व्यापाऱ्याने 10-12 जानेवारीला वाझेकडे 80 ते 86 लाख रुपये दिले. त्यानंतर 17-18 जानेवारीला 40 लाख रुपये दिले असं या व्यापाऱ्याने एनआयएला सांगितलं आहे.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMumbaiमुंबई