मुंबईतही घडली होती 'पुष्पक एक्स्प्रेस'सारखी भयंकर घटना! लोकलमधील 49 महिलांनी गमावले होते प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:54 IST2025-01-23T12:48:42+5:302025-01-23T12:54:59+5:30

Mumbai Local Train Accident: पुष्पक एक्स्प्रेस लखनौवरून मुंबईकडे येताना एक दुर्दैवी घटना घडली. यात १२ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला. या घटनेला केवळ एक अफवा कारणीभूत ठरली. अशीच घटना मुंबई लोकलमध्ये घडली होती, ज्यात तब्बल ४९ महिलांचा मृत्यू झाला होता.

एक अफवा कशी अनेकांचे जीव घेऊ शकते, याची प्रचिती देणारी घटना जळगाव जिल्ह्यात घडली. २२ जानेवारी रोजी लखनौवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर प्रवाशी उड्या मारून सैरावैरा पळत सुटले. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

त्याचवेळी मुंबईहून कर्नाटकच्या दिशेने निघालेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली अनेक प्रवाशी चिरडले गेले. यात १२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक गंभीर जखमी झाले. पुष्पक एक्स्प्रेसमधील घटनेने १९९३ मध्ये मुंबईत घडलेल्या लोकल अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. ज्यात घराकडे निघालेल्या ४९ महिलांना आपला जीव गमावावा लागला होता.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये अनेक अपघात झाले आहेत. पण, ऑक्टोबर १९९३ मध्ये झालेला अपघात खूपच धक्कादायक होता. १३ ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर हा अपघात घडला होता.

चर्चगेटवरून महिला विशेष लोकल निघाली होती. मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. लोकल कांदिवली स्टेशनमधून निघाल्यानंतर अचानक एका डब्ब्यात धूर निघताना दिसला.

आग लागल्याचे काही महिला ओरडल्या. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. लोकलमध्ये आग लागल्याच्या अफवेने सर्वच महिला घाबरल्या. काहींनी चैन ओढली, पण गाडी थांबली नाही. त्यामुळे धावत्या लोकलमधून अनेक महिलांनी उड्या मारल्या.

महिलांनी बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या मारल्या. त्याचवेळी चर्चगेटकडे जाणारी लोकल आली. या लोकलखाली अनेक महिला चिरडल्या गेल्या आणि ठार झाल्या.

मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने मदत व बचावकार्यात प्रचंड अडथळे आले होते. एका अफवेमुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ४९ महिलांचा जीव गेला होता.