By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:43 IST
1 / 12Mumbai Local Train Ticket M-UTS And ATVM: मुंबईकरांसाठी रेल्वेकडून विविध सोयी-सुविधा दिल्या जात असतात. मुंबईत लाखो प्रवासी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. तसेच बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असते. यातच लोकल ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यासाठी मध्य रेल्वेने एम-यूटीएस, एटीव्हीएमद्वारे जलद तिकीट काढण्याचा पर्याय दिला आहे. 2 / 12या सुविधेचा हजारो प्रवासी लाभ घेताना पाहायला मिळत आहे. डिजिटल तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मध्य रेल्वेने ३१.१०.२०२५ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एम-यूटीएस (मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली) सहाय्यक योजना यशस्वीपणे सुरू केली.3 / 12एम-यूटीएस सहाय्यक योजना अनारक्षित तिकिटे देण्यासाठी स्मार्ट व तंत्रज्ञानाधारित प्रणाली सादर करते. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षित एम-यूटीएस सहाय्यक मोबाईल फोन आणि ब्लूटूथ-सक्षम प्रिंटरच्या साहाय्याने बुकिंग काउंटरजवळ तसेच प्रवाशांच्या वर्दळीच्या परिसरात सहजपणे अनारक्षित तिकिटे जारी करतात.4 / 12प्रवाशांना अधिक तिकीट सुविधा, सुलभता आणि सोयीचा अनुभव मिळतो. एम-यूटीएस सहाय्यकांची नियुक्ती केल्यामुळे तिकीट काउंटरवरील रांगा लक्षणीयरीत्या कमी होत असून तिकीट वितरण प्रक्रिया अधिक जलद झाली आहे. 5 / 12विशेषतः गर्दीच्या वेळेत यामुळे प्रवाशांच्या समाधानात वाढ होत आहे. ०१.११.२०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीन एम-यूटीएस सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एम-यूटीएस सहाय्यकांची कामगिरी उत्साहवर्धक असल्याचे सांगितले जात आहे.6 / 12नोव्हेंबर २०२५: ३७,२६७ तिकिटे जारी; ५४,१६९ प्रवाशांना लाभ. डिसेंबर २०२५: ४९,१६७ तिकिटे जारी; ७०,४६२ प्रवाशांना लाभ. जानेवारी २०२६: ५०,३०६ तिकिटे जारी; ७२,५६९ प्रवाशांना लाभ. 7 / 12तीन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एम-यूटीएस सहाय्यक योजनेतून १.९७ लाखांहून अधिक प्रवाशांना याचा लाभ मिळाला आहे. 8 / 12एम-यूटीएस उपक्रमासोबतच मुंबई विभागाने स्वयंचलित तिकीट प्रणालीची पायाभूत सुविधा अधिक बळकट केली आहे. मुंबई विभागातील ८८ स्थानकांवर एकूण ८०३ एटीव्हीएम उपलब्ध आहेत.9 / 12याशिवाय, ३३२ नवीन एटीव्हीएम खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यापैकी २४८ यंत्रे मुंबई विभागात बसविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांसाठी तिकीट मिळविण्याची सुविधा अधिक जलद, सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.10 / 12हा उपक्रम प्रवासी-केंद्रित सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या दृढ वचनबद्धतेवर अधोरेखित करतो. एम-यूटीएस सहाय्यक योजना आणि एटीव्हीएम सुविधांचा विस्तार यांद्वारे मध्य रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रतीक्षा वेळ कमी करत आहे, कार्यक्षमता वाढवत आहे आणि उपनगरी रेल्वे प्रवास अधिक सुरळीत, जलद व सोयीस्कर बनवत आहे.11 / 12दरम्यान, मुंबईकर प्रवाशांसाठी २३८ नवीन एसी लोकल दाखल होणार असून, त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. एसी लोकलसाठी निविदा काढण्यात आली आहे. 12 / 12लोकलची गर्दी लक्षात घेऊन प्रवास सुसह्य होण्याच्या दुष्टीने डब्यांची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. मुंबईकरांची नवी लाइफलाइन मेट्रोपेक्षा अधिक सक्षम, जलद आणि आरामदायी असेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. फलाटांची लांबी वाढवण्याचेही काम सुरू आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी हे फायदेशीर ठरेल. सध्या दररोज ३,४०० लोकल फेऱ्या सुरू आहेत. तसेच पाचव्या सहाव्या मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.