राणीच्या बागेत भरली प्राणी-पक्ष्यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:08 PM2020-01-28T14:08:38+5:302020-01-28T14:30:01+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे प्राणी व पक्ष्यांच्या सहा दालनांचे लोकार्पण करण्यात आले. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)

अस्वल, तरस, कोल्हा आणि बिबट्या यांच्यासह विविध प्रजातींच्या सुमारे शंभर पक्षी असलेले मुक्त पक्षी विहार दालन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

देश-विदेशातील शंभर पक्षी येथे जवळून न्याहळता येतील. अशा प्रकारचे भारतातील हे पहिलेच दालन आहे.

भायखळ्यातील राणीच्या बागेत मुक्कामाला आलेल्या नवीन पाहुण्यांचे 26 जानेवारीपासून मुंबईकरांना दर्शन.

बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांच्यासाठीही उच्च दर्जाची पारदर्शकता असणाऱ्या काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने खुली करण्यात आली आहेत.

तब्बल 18 हजार 234 चौरस फुट क्षेत्रफळ असणाऱ्या या दालनात देश- विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे 100 छोटे-मोठे पक्षी आहेत.

कर्नाटकातील मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालायातून आणलेला तरस, गुजरातमधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल या प्राण्यांसाठी दालने उभारण्यात आली आहेत.

दालनामध्ये असणाऱ्या प्राण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सचित्र माहितीफलक दालनाजवळ बसविण्यात आले आहेत.

बिबट्यासाठी उभारण्यात आलेल्या दालनाचे क्षेत्रफळ 28 हजार 879 चौरस फूट एवढे आहे. अस्वलासाठी 22 हजार 625 चौरस फूट, तरसासाठी नऊ हजार 472 चौरस फूट आणि कोल्ह्यासाठी सात हजार 265 चौरस फूट आकाराचे दालन उभारण्यात आले आहे.

96 मीटर लांबीचा पादचारी पूल. वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे असणाऱ्या या पुलावरुन मुक्त पक्षी विहारात नागरिक प्रवेश करू शकतील.

विहारामध्ये 16 फुट उंचीवरुन वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळदेखील आहे.

पाण्यातील कासव अर्थात टर्टल व जमिनीवरील कासव अर्थात टॉरटॉईज हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे एक हजार 234 चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे. तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही या ठिकाणी आहेत.