Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पुन्हा 'महिला राज'! भाजपाकडून महापौरपदासाठी कुणाची नावे सर्वाधिक चर्चेत? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:17 IST

1 / 10
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर यंदा महायुतीचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ८९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष बनला आहे. मात्र शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांच्या पाठिंब्याशिवाय भाजपाला मुंबईत महापौर बसवणे कठीण जाणार आहे.
2 / 10
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत शहरात खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होईल हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत महिला महापौर विराजमान होईल. परंतु आता कोणत्या महिला नगरसेवकाला ही संधी मिळते याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा-शिंदेसेनेकडे बहुमत असल्याने ते सहजपणे महापौर बनवू शकतात. त्यात भाजपाकडे सर्वाधिक जागा असल्याने महापौर त्यांचाच होईल हे जवळपास निश्चित आहे.
3 / 10
मुंबईच्या महापौरपदावर कोण बसेल याबाबत येत्या २-३ दिवसांत चित्र स्पष्ट होईल. अद्याप भाजपाने त्यांच्याकडील नगरसेवकांमध्ये गटनेता आणि सभागृह नेता ठरवला नाही. पुढील २ दिवसात भाजपा नगरसेवकांची बैठक होईल. त्यात ही नावे निश्चित केली जातील अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
4 / 10
निवडणुकीच्या काळात मराठी-अमराठी महापौर यावरून प्रचंड रान उठले होते. त्यात भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात मुंबईचा महापौर मराठीच होईल असं सांगितले होते. त्यामुळे मुंबईत मराठी महापौर होईल मात्र तो कोण असेल याबाबत भाजपातील काही महिला नगरसेवकांची नावे पुढे येत आहेत.
5 / 10
अलका केरकर - भाजपाच्या अनुभवी नगरसेविका ज्यांनी दीर्घकाळ महापालिकेत काम केले आहे. वार्ड क्रमांक ९८ मधून त्या निवडून आल्या आहेत. युती काळात मुंबईच्या उपमहापौरपदावर त्यांनी काम केले आहे. अलका केरकर या पूर्वी शिक्षिका होत्या, त्यांनी वांद्रे परिसरात सामाजिक काम करत राजकारणात प्रवेश केला. सलग चौथ्यांदा त्या महापालिकेवर निवडून आल्या आहेत.
6 / 10
हर्षिता नार्वेकर - भाजपाच्या नगरसेविका म्हणून वार्ड २२५ मधून त्या निवडून आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील नागरी प्रश्नांवर त्या काम करत आहेत. २०१७ साली त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील त्या सदस्या आहेत.
7 / 10
रितू तावडे - वार्ड क्रमांक १३२ मधून रितू तावडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. घाटकोपरमधील गुजराती बहुल भागातून त्या निवडून आल्या आहेत. सध्या महापौरपदासाठी त्यांचेही नाव आघाडीवर आहे.
8 / 10
शीतल गंभीर - वार्ड क्रमांक १९० मधून शीतल गंभीर दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे माहिम दादर या विधानसभेत जिथे ठाकरेंचा गड समजला जातो त्याठिकाणी शीतल गंभीर या भाजपाच्या एकमेव नगरसेविका आहेत. त्याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या त्या कन्या आहेत. शीतल गंभीर यांच्या कामाचं कौतुक स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिवाजी पार्कवरील सभेत केले होते. भाजपा महिला मोर्चाच्या महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे.
9 / 10
राजश्री शिरवाडकर - सायन माटुंगा भागातील वार्ड क्रमांक १७२ मध्ये राजश्री शिरवाडकर नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. सलग दुसऱ्यांदा त्यांनी हा विजय मिळवला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या त्या सरचिटणीस आहेत. त्याशिवाय स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
10 / 10
योगिता कोळी - मालाड पश्चिम येथील वार्ड क्रमांक ४६ येथील योगिता कोळी यादेखील भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. याआधी त्यांनी सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल कल्याण समिती या महापालिकेच्या समितींमध्ये सदस्य म्हणून काम केले आहे. कोळी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंबईचे खरे मालक असलेल्या कोळी समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने योगिता कोळी यांचेही नाव महापौरपदाच्या स्पर्धेत आहे.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना