Join us  

छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 7:46 PM

1 / 6
शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र मैदानात या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
2 / 6
छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य महाविकास आघाडीतील नेते मंडळीही उपस्थित होते.
3 / 6
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ते होऊ शकलं नाही. महाराष्ट्र सदन बांधण्यात महाराष्ट्र सरकारने एक रुपया देखील खर्च केला नाही. तरी देखील छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, त्यांची बदनामी करण्यात आली, असा आरोप अजित पवार यांनी केला.
4 / 6
अजित पवार पुढे म्हणाले की, छगन भुजबळ ठोशास ठोसा द्यायचं चांगलं जाणतात. ज्यावेळी शिवसेनेचे आमदार गेले, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांना परत आणण्याची जबाबदारी छगन भुजबळांना दिली असती, तर ते सगळ्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, असं विधानही अजित पवार यांनी यावेळी केलं.
5 / 6
उद्धव ठाकरेंनी सदर कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी त्यांनी फारुक अब्दुल्ला यांच्या भेटीबाबत माहिती दिली. फारुक अब्दुल्ला आणि माझी बऱ्याच दिवसांनी भेट झाली. यामागील दोन महत्त्वाची कारण देताना त्यांनी अब्दुल्ला यांचं वय झालं आहे असं सांगतानाच दुसरं कारण हे महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर फार दूर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच फारुक अब्दुल्ला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
6 / 6
दरम्यान, जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते', असं विधानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. 'प्रत्येकाचंच वय वाढत असतं. पण बाळासाहेब सांगायचे वयानं माणूस मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो. त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसं आहे. नुसतं तरुण मनाचं असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इर्ष्या असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी