Join us

"राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका," राज ठाकरेंच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 22:33 IST

1 / 11
निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो,असंही राज ठाकरे म्हणाले.
2 / 11
राज ठाकरे म्हणाले, अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही.
3 / 11
'काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. 'अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही, असंही ठाकरे म्हणाले.
4 / 11
राज ठाकरे म्हणाले, तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत.
5 / 11
माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या.'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका, असंही ठाकरे म्हणाले.
6 / 11
'माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे की, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या. तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.'
7 / 11
जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल, असंही ठाकरे म्हणाले.
8 / 11
आज निवडणुकीच्या जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला सर्व पक्ष कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.
9 / 11
राज ठाकरे म्हणाले, मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे की, 'राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.'
10 / 11
माझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असंही ठाकरे म्हणाले.
11 / 11
भाषणाच्या शेवटला ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे