CoronaVirus In Maharashtra: कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर...; राजेश टोपेंनी सांगितला एकच उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 07:37 IST
1 / 8मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यात मंगळवारी काही अंशी दिलासादायक चित्र दिसून आले. राज्यात दिवसभरात निदान झालेल्या नव्या काेराेना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून आली. मंगळवारी ९ हजार ९२७ नवे रुग्ण आणि ५६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,३८,३९८ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ५५६ झाला आहे.2 / 8 दिवसभरात १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २०,८९,२९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४ टक्के एवढे झाले. राज्यात ९५ हजार ३२२ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.3 / 8मुंबईत मंगळवारी १ हजार १२ रुग्ण आणि २ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ५८४ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५०६ झाला आहे. दिवसभरात १ हजार ५१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख १२ हजार ४५८ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी २१९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या १० हजार ७३६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.4 / 8कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन जाहीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण २३ हजारांपर्यंत वाढल्याने दैनंदिन रुग्ण नोंद वाढली आहे. मुंबईत स्थिती नियंत्रणात असल्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन करण्यात येणार नाही.5 / 8लोकलसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. वारंवार सूचना करूनही लोक मास्क लावत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे नियम न पाळल्यास तसेच यापुढेही रुग्णवाढ अशीच कायम राहिल्यास लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. 6 / 8 मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रुग्णवाढ दिसत असली तरी चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पाच टक्के घट आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असा पुनरुच्चार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे. 7 / 8 कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर त्यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. कोरोनाचा साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. 8 / 8 नागरिकांना कोरोनासंबर्धीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले ‘मी जबाबदार’ या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे. कोरोनाची साथ स्वयंशिस्तीनेच आटोक्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.