corona vaccine : युक्रेनियन शास्त्रज्ञाने केली स्थापना, कॉलरा, प्लेगविरोधात बनवली लस; असा आहे हाफकिनचा इतिहास
By बाळकृष्ण परब | Updated: April 16, 2021 11:19 IST
1 / 10देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीचे उत्पादन करण्याची परवानगी हाफकिन इन्स्टिट्युटला दिली आहे. 2 / 10मुंबईतील परळ येथे असलेल्या हाफकिन इन्स्टिट्युटला कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने केली होती. 3 / 10लसनिर्मितीमधील आघाडीची संस्था असलेल्या हाफकिन इन्स्टिट्युने आतापर्यंतच्या इतिहासात विविध आजारांवरील लसींबाबत संशोधन केले आहे. आज आपण या संस्थेचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊयात. 4 / 10हाफकिन इन्स्टिट्युटची स्थापना व्लादेमेर एम. हाफकिन या युक्रेनियन शास्त्रज्ञांनी १८९९ मध्ये मुंबईत केली. तत्पूर्वी हाफकिन हे १८९० पासून संशोधन करत होते. त्यांनी भारतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर पसरणाऱ्या कॉलरा आणि प्लेगच्या साथींना रोखण्यासाठी लस विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. 5 / 10१८९० च्या दशकात भारतात कॉलराची साथ पसरली असताना हाफकिन यांना भारतात मोठ्या प्रमाणात विरोधातचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी कॉलरा आणि प्लेगवर विकसित केलेली लस प्रभावी ठरली होती. 6 / 10व्लादेमेर हाफकिन हे योगायोगानेच भारतात आले. मात्र नंतर २२ वर्षे ते भारतातच राहिले. मुळचे युक्रेनियन असलेल्या हाफकिन यांना ते ज्यू असल्याने प्राध्यापक बनवण्यात आले नाही. त्यानंतर ते त्यांचे गुरू लुई पाश्चर यांच्यासोबत काही काळ राहिले. तिथे कॉलरावरील लस विकसित करण्याचा निर्धार त्यांनी केला. प्राण्यांवरील प्रयोगानंतर त्यांनी स्वत:ला ती लस टोचून घेतली. मात्र तिच्या मानवी परीक्षणास परवानगी नाकारण्यात आली. 7 / 10नंतर लॉर्ड फ्रेडरिक हेमिल्टन डफरिन यांच्या माध्यमातून ते भारतात पोहोचले. मात्र इथेही त्यांच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यांची लस भारतात उपयुक्त ठरणार नसल्याचे सांगितले गेले. मात्र नंतर त्यांनी ४२ हजार जणांवर कॉलराच्या लसीचे यशस्वी परीक्षण केले. या लसीमध्ये सुधारणा झाली. नंतर कॉलरापासून बचावासाठी या लसीचा केवळ एक डोस घेणे आवश्यक ठरले. 8 / 10कॉलराची साथ संपल्यावर भारतात प्लेगने थैमान घातले. तेव्हा हाफकिन यांच्यावर प्लेगविरोधातील लस विकसित करण्याची जबाबदारी दिली गेली. त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी प्रयोगशाळा विकसित करण्यात आली. तिथे तीन महिन्यांच्या संशोधनानंतर त्यांनी प्लेगविरोधात लस विकसित केली. तिचे सशावर यशस्वी परीक्षण केले. त्यानंतर भायखळा कारागृहातील कैद्यांवर लसीची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी १५४ कैद्यांना प्लेगने संक्रमित करण्यात आले. त्यात पहिल्याच दिवशी ३ कैद्यांचा मृत्यू झाला. पुढे अजून काही कैद्यांचा मृत्यू झाला. मात्र हा प्रयोग यशस्वी मानला गेला. मग प्लेग पसरलेल्या भागात एक हजार जणांना ही लस दिली गेली. हे परीक्षण ५० टक्के यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले. 9 / 10देशाला दोन गंभीर साथींपासून वाचवणाऱ्या डॉ. व्लादेमेर हाफकिन यांची आठवण म्हणून भारत सरकारच्या टपाल विभागाने १९६४ मध्ये टपाल तिकीट प्रसिद्ध केले. तत्पूर्वी १९२५ मध्ये ग्रँट रुग्णालयातील त्यांच्या प्रयोगशाळेला हाफकिन इन्स्टिट्युट हे नाव दिले गेले. मात्र आजच्या घडीला डॉ. हाफकिन हे देशवासियांच्या विस्मरणात गेले आहेत. 10 / 10पण कोरोनाच्या साथीमुळे देशाला दोन साथींपासून वाचवणाऱ्या व्लादेमेर हाफकिन यांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था आता महत्त्वाची भूमिका बजावू शकते.