Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा मुद्दा, भावनिक राजकारण निष्प्रभ, ‘या’ १० कारणांमुळे मुंबईत झाला ठाकरे बंधूंचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 21:35 IST

1 / 11
राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आज लागलेल्या निकालांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या निकालांनंतर आता ठाकरे बंधूंचा पराभव का झाला? याची काही कारणं समोर येत आहे.
2 / 11
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरेंची गेल्या २५ वर्षांपासूनच सत्ता होती. त्यामुळे साहजिकपणे या २५ वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना ठाकरेंना करावा लागला. त्यात मुंबईमध्ये असलेल्या नागरी समस्यांसाठी ठाकरेंची सत्ताच कारणीभूत असल्याचा आरोप भाजपाने लावून धरला, तसेच त्याचं समाधानकारक उत्तर ठाकरेंना देता आलं नाही. त्याची परिणती अखेरीस आजच्या पराभवात झाली.
3 / 11
गतवर्षी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृत युती करण्यास ठाकरे बंधूंनी खूप उशीर केला. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली तरी ठाकरे बंधूंच्या युतीचे गणित जुळत नसल्याचे चित्र दिसत होतं. त्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला.
4 / 11
ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी अनेक आश्वासने देणारा वचननामा प्रकाशित केला होता. तसेच आदित्य ठाकरे यांनीही विकासाचं व्हिजनही मांडलं. मात्र विकासाच्या मुद्द्याऐवजी मराठी अस्मिता, अमराठी आक्रमण, उद्योगपती अदानी यांची भाजपाशी असलेली जवळीक हेच मुद्दे ठाकरे बंधूंकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. तसेच ही बाब अंतिम निकालामध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांचं नुकसान करणारी ठरली.
5 / 11
मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जेन झी अर्थात नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात सपशेल अपयशी ठरली. ठाकरे बंधूंकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या रूपात युवा चेहरे होते. मात्र प्रचारामध्ये ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मिता, मुंबईचा इतिहास आदी मुद्दे चर्चेत आणले गेले. मात्र हे मुद्दे जेन झेड मतदारांना आकर्षित करू शकले नाहीत.
6 / 11
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ठाकरे बंधूंनी मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला. तसेच उद्धवसेनेचं बलस्थान असलेल्या शाखांमध्ये भेटी देण्याचा कार्यक्रम ठाकरे बंधूंनी प्रचारादरम्यान हाती घेतला. समाजमाध्यमांवर हवा करण्यातही ठाकरे बंधू यशस्वी ठरले. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी जी मायक्रो मॅनेजमेंट लागते ती उभी करण्यात त्यांना अपयश आले.
7 / 11
काही वर्षांपूर्वी भाजपाने लाव रे तो व्हिडीओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी भाजपाला जेरीस आणले होते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेतही लाव रे तो व्हिडीओद्वारे भाजपावर हल्ला केला. मात्र भाजपाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवर टीका करणारे व्हिडीओ व्हायरल करून हा मुद्दा ठाकरेंवरच उलटवला.
8 / 11
मुंबई महानगपालिका निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा आणि दुसरीकडे भाजपा विरोधामुळे लोकसभा आणि विधानसभेप्रमामे मुस्लिम मतदारही आपल्यामागे उभा राहील असा उद्धवसेनेचा अंदाज होता. मात्र मुंबईतील मराठी बहूल भाग वगळता इतर ठिकाणी मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे एकगठ्ठा उभा राहताना दिसला नाही. तर काँग्रेस सोबत नसल्याने मुस्लिम मतदारही ठाकरेंच्या मागे न जाता काँग्रेससह एमआयएम आणि इतर पक्षांकडे वळला.
9 / 11
मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत ठाकरेंनी हिंदुत्वाऐवजी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे भाजपाकडून हिंदुत्व, ‘मुंबईत हिंदू महापौर होणार’ अशी घोषणा सुरू असताही ठाकरेंकडून त्याला संयमी भाषेत उत्तर दिलं जात होतं. अल्पसंख्याक मतांवर लक्ष असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीकडून प्रचारादरम्यान हिंदुत्वाबाबत फार काही बोललं गेलं नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी मराठी मतदार कुठेतरी महायुतीकडे वळला आणि त्याचा ठाकरे बंधूंच्या युतीला बसला, असे निकालामधून दिसत आहे.
10 / 11
या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी तापवलेला मराठी अस्मितेचा मुद्दा एकीकडे उद्धवसेना आणि मनसेसाठी फायदेशीर ठरला. तर दुसरीकडे याच मुद्द्यामुळे बिगर मराठी मतांचं ठाकरेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाल्याने त्याचा फटका ठाकरे बंधूच्या युतीला बसला. तर हा बिगर मराठी मतदार भाजपा आणि शिंदेसेना महायुतीकडे वळला.
11 / 11
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीच्या पराभवाचं कारण ठरलेली सर्वात मोठी बाब म्हणजे काँग्रेससोबत न झालेली आघाडी ही होय. काँग्रेस वेगळा लढल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला मिळालेली मते या निवडणुकीत उद्धवसेनेला मिळाली नाहीत. त्याचा मोठा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसला. जर काँग्रेस सोबत असती तर या महानगरपालिकेत वेगळं चित्र दिसलं असतं.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाMNSमनसे