By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:06 IST
1 / 12Indian Railway Kavach System On Western Railway: भारतीय रेल्वे एकामागून एक मैलाचे दगड पार करताना दिसत आहे. चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनलाही प्रतिसाद वाढताना पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रवाशांच्या सोयी, सुविधांवर भर देत असताना दुसरीकडे मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेवरून भारतीय रेल्वेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळते.2 / 12गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेच्या अनेक ट्रेनचे भीषण अपघात झालेले दिसले असून, कवच यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम कुठपर्यंत आले, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. नवीन अत्याधुनिक ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी करण्यात आल्या असल्या तरी वाढते अपघात भारतीय रेल्वेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. यातच मुंबईकरांसाठी भारतीय रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे.3 / 12पश्चिम रेल्वेवरील विरार ते बडोदा विभागात 'कवच' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मुंबईतून 'कवच' प्रणालीसह धावणारी दादर ते भुज सयाजी नगरी एक्स्प्रेस ही पहिली रेल्वेगाडी ठरली आहे. हा प्रकल्प पश्चिम रेल्वेच्या नागदा-बडोदा-सुरत-विरार-मुंबई सेंट्रल या विभागात तयार केला जाणार असून त्यासाठी ३९७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 4 / 12पश्चिम रेल्वेवरील बडोदा-सुरत-विरार विभागात जानेवारी २०२३ मध्ये कवच प्रणाली सुरू करण्यात आली. ३० जानेवारी २०२६ पर्यंत या ३४४ किमी विभागामध्ये कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे. पश्चिम रेल्वेने यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात कवच प्रणाली सुरू केली. 5 / 12आतापर्यंत एकूण ४३५ किमी विभागामध्ये कवच प्रणाली सुरू झाली आहे. 'कवच' ही भारतात विकसित केलेली एक 'स्वयंचलित ट्रेन संरक्षण' (एटीपी) प्रणाली आहे, जी लोको पायलट ब्रेक लावण्यात अयशस्वी झाल्यास आपोआप ब्रेक लावून रेल्वे अपघात टाळण्यासाठी तयार केली आहे. पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत एकूण ३६४ इंजिनमध्ये कवच प्रणाली बसवण्यात आली आहे.6 / 12अपघात टाळण्यासह सिग्नल तोडून गाडी पुढे जाण्यापासून प्रतिबंध, वेगमयदिचे उल्लंघन रोखणे, रेल्वे फाटकावर स्वयंचलित सूचना देणे, धुके, कमी दृश्यमानता व प्रतिकूल हवामानात लोको - पायलटला मदत व्हावी यासाठी - कॅबमध्ये सिग्नलची माहिती दाखवणे अशा वैशिष्ट्यांचाही कवचमध्ये समावेश आहे. 7 / 12कवचच्या टप्प्यात विरार-मुंबई सेंट्रल विभागातील कवच यंत्रणा सप्टेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य याअंतर्गत ठेवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर २,६६७ मार्ग किलोमीटर अंतरात कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी १,४३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी २,४७६ मार्ग किलोमीटरसाठी प्रस्ताव विचाराधीन आहेत.8 / 12विरार-वडोदरा विभागात कवचसाठी विविध टप्प्यांत कामे करण्यात आली. प्रत्येक स्थानक व स्वयंचलित सिग्नलिंग विभागासाठी स्वतंत्र सिग्नलिंग योजना तयार करणे, रुळांवर आठ हजारांहून अधिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी टॅग बसवणे, स्थानके आणि इंजिनांमध्ये सातत्यपूर्ण रेडिओ संपर्कासाठी नियोजनासाठी ५७ रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स उभारण्यात आले असून स्थानकांवर आवश्यक उपकरणे बसवण्यात आली आहेत.9 / 12विद्यमान कवच यंत्रणा डब्ल्यूएपी सात श्रेणीच्या इंजिनांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील ३६४ इंजिनांवर ही प्रणाली आधीच बसवण्यात आली आहे. उर्वरित २०० इंजिनांवरील कवच यंत्रणा पुढील एका वर्षात पूर्ण केली जाईल, असे अतिरिक्त महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार महाव्यवस्थापक) प्रदीप कुमार यांनी म्हटले आहे. 10 / 12कवच ही स्वदेशी विकसित करण्यात आलेली स्वयंचलित रेल्वे संरक्षण (एटीपी) प्रणाली आहे. रेल्वे रुळांवरील उपकरणे, रेल्वे इंजिनवरील यंत्र आणि सॅटेलाइटच्या मदतीने रेल्वेगाड्यांचा वेग पाहून टाळण्याचे काम करते. कवच स्वदेशी समोरासमोरून होणारा अपघात असल्याने युरोपीयन तंत्रज्ञानाच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.11 / 12यापूर्वीच विभागात वडोदरा-अहमदाबाद कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. यामुळे आता पश्चिम रेल्वेवर एकूण ४३५ मार्ग किलोमीटर कवच यंत्रणेच्या सुरक्षा कक्षेत आला आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या डेटा रिलीजमध्ये असा दावा केला होता की, गेल्या दशकात रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट झाली आहे. एकाच दशकात रेल्वे अपघातांमध्ये ९० टक्क्यांनी घट झाली आहे. 12 / 12कवच या तंत्रज्ञानामुळे अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. कवच तंत्रज्ञान गाड्या स्वयंचलितपणे ब्रेक लावण्यात, सिग्नल ओव्हररन रोखण्यात आणि अपघात रोखण्यात अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत. यामुळे भविष्यात अपघात आणखी कमी होतील. आता, स्वदेशी कवच प्रणालीचा वेगाने विस्तार केला जात आहे. कवच टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केला जात आहे.