Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांना मोठी गुड न्यूज! ‘ही’ वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:23 IST

1 / 12
Vande Bharat Express Train With 20 Coach: भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्याचा निर्णय घेतला. यात आता मुंबईतून धावणाऱ्या आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे.
2 / 12
MMCT-ADI Vande Bharat Express Train 20 Coach: गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. अल्पावधीत प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला लाभला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली.
3 / 12
आताच्या घडीला वंदे भारत ट्रेनच्या सुमारे १६४ सेवा देशभरात प्रवाशांना सेवा देत आहेत. यात आणखीही अनेक मार्गांची भर पडणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून ११ वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत. यातील ६ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबईत आहेत. या वंदे भारत ट्रेनमधून दरमहा लाखो प्रवासी प्रवास करतात.
4 / 12
चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. देशाची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा ते कामाख्या या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.
5 / 12
यातच मुंबईतून सुटणाऱ्या आणखी एका वंदे भारत ट्रेनचे ४ कोच वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद पाहून १६ कोचसह सुरू असणारी वंदे भारत ट्रेन आता २० कोचसह धावणार आहे. ट्रेन क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या तात्पुरती १६ वरून २० करण्यात येत आहे.
6 / 12
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तात्पुरते ४ अतिरिक्त डबे जोडले जातील. या व्यवस्थेमुळे २६.०१.२०२६ ते ०७.०३.२०२६ पर्यंत ही ट्रेन २० डब्यांच्या रेकसह धावेल.
7 / 12
प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे. वेळापत्रक, थांबे आणि कोच रचना याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकता, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
8 / 12
ट्रेन क्रमांक २२९६२ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन १२ मार्च २०२४ पासून सुरू झाली. अहमदाबाद येथून सकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांनी वंदे भारत ट्रेन सुटते आणि सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथे पोहोचते. तसेच परतीच्या प्रवासाला जाताना ट्रेन क्रमांक २२९६१ ही वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रलहून दुपारी ०३ वाजून ४५ मिनिटांनी सुटते आणि रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचते.
9 / 12
प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसासादामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर ही दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. तत्पूर्वी, ३० सप्टेंबर २०२२ रोजी याच मार्गावर मुंबई ते गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात आली होती. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ०६ वाजता सुटते आणि रात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटांनी परत मुंबई सेंट्रलला येते. १६ कोच असलेली मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मे २०२५ च्या दरम्यान २० कोचसह धावू लागली.
10 / 12
यानंतर आता मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुसरी वंदे भारत ट्रेनही २० कोचसह धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्ग हा पश्चिम रेल्वेवरील सर्वांत व्यस्त मार्ग मानला जातो. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ट्रेन या मार्गावरून धावतात. यात आता या मार्गावरील दोन्ही वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा आणि लाभ मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
11 / 12
आताच्या घडीला ट्रेन क्रमांक २२९६१ वंदे भारत ट्रेनला १४ एसी चेअर कार कोच असून, दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आहेत. मुंबई सेंट्रलहून सुटली की, ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा असे थांबे घेऊन अहमदाबाद येथे पोहोचते. चार कोच वाढल्यामुळे अतिरिक्त जागा प्रवाशांसाठी खुल्या होणार आहेत.
12 / 12
दरम्यान, ट्रेन क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस-वटवा/अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस तात्पुरती मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल आणि येथूनच सुटेल. ही व्यवस्था २६.०१.२०२६ ते ०७.०३.२०२६ या दरम्यान लागू असेल. ट्रेन क्रमांक १२९३३ कर्णावती एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथून दुपारी १:५५ वाजता सुटेल, तर ट्रेन क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. बोरिवली आणि वांद्रे/अहमदाबाद दरम्यानच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMumbaiमुंबईahmedabadअहमदाबादIndian Railwayभारतीय रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सGujaratगुजरात