जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
By दीपक भातुसे | Updated: January 7, 2026 06:15 IST2026-01-07T06:15:36+5:302026-01-07T06:15:36+5:30
१२ जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. त्यासाठी सज्ज असल्याचे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असलेल्या १२ जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. त्यासाठी सज्ज असल्याचे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्यात निवडणूक रखडलेल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या आहेत. यापैकी २० जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक आहे. तिथल्या निवडणुका पुढील निर्णयापर्यंत न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. २१ जानेवारीला सुनावणी आहे.
पहिल्या टप्प्यात..?
ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.