झीरो टॉलरन्स! काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत न झाल्यास कारवाई होणार, आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:26 IST2025-02-12T13:25:11+5:302025-02-12T13:26:01+5:30
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी पालिकेचे झीरो टॉलरन्स धोरण आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,

झीरो टॉलरन्स! काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत न झाल्यास कारवाई होणार, आयुक्तांचे निर्देश
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी पालिकेचे झीरो टॉलरन्स धोरण आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत. ३१ मे २०२५ पर्यंत उद्दिष्टाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत. शिवाय सेवा वाहिन्यांसाठी यंत्रणांशी समन्वय ठेवावा असेही त्यांनी सांगितले.
पालिकेकडून पहिल्या टप्प्यात ३२४ किमी (६९८ रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते), अशा एकूण ७०१ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ७५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्के कामे ३१ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली.
७५ दिवसांचा काळ
काँक्रिटीकरणाच्या कामात रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवस, तर सेवा वाहिन्यांची कामे गृहित धरुन ७५ दिवसांचा काळ जातो. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो.
कंत्राटदारांनी एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत. काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी गुणवत्ता देखरेख संस्थेबरोबरच अभियंत्यांनीही दक्षता घ्यावी. काँक्रीट प्लांटपासून ते काँक्रीट रस्त्यावर क्युरिंग करण्यापर्यंतच्या कामांवर देखरेख ठेवावी.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई पालिका
अभियंत्यांनी खबरदारी घ्यावी
१. पालिकेने सर्व डांबरी, पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम हाती घेतल्याने बहुतांश ठिकाणी खोदकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच विनाकारण खोदकाम करुन कामे प्रलंबित राहू नये, याची खबरदारी अभियंत्यांनी घेतली पाहिजे, असे आयुक्तांनी सांगितले.
२. रस्ते विभागातील सर्व अभियंत्यांनी फिल्ड गेलेच पाहिजे. नागरिकांच्या सोयीसाठी माहिती फलक, बॅरिकेड्स लावणे आवश्यक आहे. दरम्यान, नवीन कामे हाती घेण्यापूर्वी सध्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३. दुसरीकडे दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन करुन ते वेळेत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या.