Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चेंगराचेंगरी घडवण्यासाठी..."; गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेंची तक्रार, केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:25 IST

वरळीतील मोर्चावेळी संताप व्यक्त करणाऱ्या त्या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Zen Sadavarte filed Police Complaint: संसदेत नारी वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने काढलेल्या जनआक्रोश मोर्चात आपला संताप व्यक्त करणाऱ्या त्या महिलेची डोकेदुखी आता वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी घातलेला गोंधळ, मंत्र्यांशी केलेली हुज्जत आणि पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने ही तक्रार दिली असून, संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एका भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती, मात्र गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. याच वाहतूक कोंडीत एक गाडी अडकली. या गाडीतील महिलेचा मुलगा सोबत असल्याने, वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या या महिलेने गाडीतून उतरून थेट मोर्चेकऱ्यांवर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला राग काढला.

अपशब्दांचा वापर आणि पाण्याची बाटली फेकली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ही महिला अत्यंत आक्रमक झाली होती. तिने पोलिसांना शांत बसा आणि निघून जा असे म्हणत त्यांचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, तिने पाण्याची बाटली फेकून मारली. मंत्री गिरीश महाजन यांनी या महिलेचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत संयमी भूमिका घेतली. मात्र, या महिलेचा आरडाओरडा आणि पोलिसांशी असलेले वर्तनाचे व्हिडिओ देशभर व्हायरल झाले.

झेन सदावर्ते यांचे गंभीर आरोप

या प्रकरणात आता झेन सदावर्ते यांनी एन्ट्री घेतली आहे. वरळी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत झेन यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. १० हजार महिलांचा सहभाग असलेल्या मोर्चात अशा प्रकारे आरडाओरडा करणे आणि बाटली फेकणे, यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडू शकली असती, असा संशय झेन यांनी व्यक्त केला आहे. ही महिला हातामध्ये मोबाईल घेऊन स्वतःचे शूटिंग करत होती. त्यामुळे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा रील्स बनवण्यासाठी तिने हा हेतूपूर्वक गोंधळ घातला का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच मंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीशी आणि ऑन-ड्यूटी पोलिसांशी अशा अर्वाच्य भाषेत बोलणे हा कायद्याचा अवमान असल्याचे झेन यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sadaverte files complaint against woman questioning minister; serious allegations made.

Web Summary : Zen Sadavarte filed a police complaint against a woman who confronted minister Girish Mahajan during a BJP protest. The complaint alleges disruptive behavior and potential for a stampede, questioning if the incident was staged for publicity.
टॅग्स :मुंबईभाजपामुंबई पोलीसगुणरत्न सदावर्ते