गांजाची पुडी न दिल्याने केली कॉटनग्रीनमध्ये तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 23:28 IST2020-03-04T23:28:34+5:302020-03-04T23:28:44+5:30
लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉक ब्रिजवर घडली.

गांजाची पुडी न दिल्याने केली कॉटनग्रीनमध्ये तरुणाची हत्या
मुंबई : तरुणाने गांजाची पुडी न दिल्याने लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉक ब्रिजवर घडली. आमिन पटेल (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका १७ वर्षांच्या युवकासह, राज भारद्वाज व राज साळुंखे यांना अटक करण्यात आली.
नागपाड्यातील सिद्धार्थनगर येथे राहत असलेल्या बंटी कांबळे व त्याचा मित्र आमिन पटेल हे दोघे कॉटनग्रीन स्थानकाच्या स्कायवॉकजवळ बोलत होते. बाजूलाच देशी दारूच्या दुकानात दारू पीत बसलेल्या तिघांनी आमिनला अडविले. त्याच्या खिशातील गांजाची पुडी मागितली. त्याने आपल्याकडे गांजा नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांनी त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
बाजूला असलेल्या लाकडी बांबूने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. तो रक्तबंबाळ होऊन खाली पडल्यानंतर तिघांनीही पळ काढला. आमिनला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. काळाचौकी पोलिसांनी मंगळवारी रात्री शिताफीने तिघांना अटक
केली. यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली, तर दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.