Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांवर चाकूने हल्ला करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव शेख झिया हुसेन असे आहे. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
कल्याणहूनमुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये बुधवारी सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. मुंब्रा येथील रहिवासी शेख जिया हुसेन हा देखील याच ट्रेनमधून प्रवास करत होता. काही वेळाने झियाला कळलं की ही ट्रेन फास्ट लोकल आहे आणि ती मुंब्रा स्टेशनवर थांबणार नाही. प्रवाशांनीही त्याला हेच सांगितल्यावर तो भडकला. डोंबिवली रेल्वे स्थानकावर येताच झियाने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीमुळे त्याला खाली उतरता आलं नाही. त्यानंतर प्रवाशांनी झियाला लोकल मुंब्रा येथे थांबणार नाही त्यामुळे तू शांत उभा राहा असे सांगितले. तरीही तो दरवाजाच्या जवळच उभा राहिला. त्यामुळे त्याचे धक्का इतर प्रवाशांना लागत होता.
त्यानंतर प्रवाशांनी धक्का लागत असल्याने त्याला जाब विचारल्यानंतर बाचाबाची झाली. त्यामुळ प्रवाशांनी झियाला चोप दिला. त्यामुळे संतालेल्या झियाने अचानक खिशातून धारदार चाकू काढून प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय वाघ (२५, नाशिक), हेमंत कांकरिया (४५, नाशिक) आणि राजेश चांगलानी (३९, उल्हासनगर) असे तीन प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर प्रवाशांनी झिया हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी आरोपी झियाविरुद्ध डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिस अधिकारी किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.