Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत दोन लाख सरकारी नोकऱ्या देणार, युवक काँग्रेसचा जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 10:00 IST

स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन केले जाईल.

मुंबई : ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करण्यात येतील आणि १,९१,००० रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि आपले सरकार सत्तेवर येताच महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद केले जाईल. अशा महत्त्वपूर्ण घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केल्या. प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘वेक अप महाराष्ट्र’ या अभिनव उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. याद्वारे राज्यातील सुमारे ३ कोटी युवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. त्यांच्या सूचनांवर विचार करुन युवक जाहीरनामा केला आहे. युवकांसाठी बनविलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा असल्याचे ते म्हणाले.जाहीरनाम्यात प्रमुख शहरात युवकांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवणे, सर्व दिव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षण देणे, गुणवान विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारकडून बँक हमी देणे, सुशिक्षित बेरोजगारांना ५,००० रुपये बेरोजगार भत्ता देणे, भूमिपुत्रांना खासगी नोक-यांमध्ये८०% आरक्षण देण्यासाठीचा कायदा करणे, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.आमचे सरकार आल्यानंतर जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीमुळे युवकांच्या समस्या मिटणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असेही तांबे यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, रीषिका राका, प्रवक्ता आनंद सिंग, सचिव विश्वजित हाप्पे, सचिव करीना झेविअर, इम्रान खान उपस्थित होते.युवक कल्याण मंत्रालयस्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन केले जाईल. जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विकसित केले जाईल. स्टार्ट-अपसाठी ५०० कोटी रुपये आणि कृषी आधारित व्यवसायांसाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांचे भाग भांडवल उभे केले जाईल, असेहीतांबे म्हणाले.

टॅग्स :नोकरीकाँग्रेस